Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअसंख्य नवलपूर्ण प्रसंगांचा साक्षीदार

असंख्य नवलपूर्ण प्रसंगांचा साक्षीदार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मी आणि माझे काही मित्र 81 सालापासून पक्षी निरीक्षण करतोय. असंख्य आठवणी आहेत. एक पक्षी शिकार करत असतांना दुसर्‍या पक्षाने त्याची शिकार केलेली पाहिली आहे.

- Advertisement -

सध्या या क्षेत्रात तरुणाईची संख्या वाढते आहे. ही फार समाधानाची बाब आहे. त्यांनी हा वसा कायम सांभाळावा असे वाटते अशा भावना नाशिकमधील ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दिगंबर गाडगीळ यांनी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, मी किमान 40 वर्षे झाली नांदुरमध्यमेश्वरला जातो आहे. गेल्या 3-4 वर्षांपासूनच पाय दुखतात त्यामुळे जाणे थांबले आहे. मी तिथे कसा जायला लागलो ते सांगतो. नाशिकला तेव्हा एक गृहस्थ होते. ते पक्ष्यांची शिकार करायचे. नंतर त्यांनी ती थांबवली. माझे पक्षी वेड त्यांना माहित होते. चल तुला हजारो पक्षी दाखवतो असे म्हणून ते एक दिवस मला, डॉ. ठकार आणि डॉ. सुळे यांना घेऊन नांदुरमध्यमेश्वरला गेले. तिथले पक्षी वैभव पाहून मी थक्क झालो होतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर होणारी पक्षांची शिकार पाहून खूप अवस्थही झालो होतो.

त्या दिवशी ते आम्हाला नांदूरमध्यमेश्वरच्या डाक बंगल्यावर घेऊन गेले. डाक बंगल्याच्या खिडक्यांवर दोरीला असंख्य पक्षी मारून टांगलेले होते. त्यात देखण्या जांभळ्या पक्ष्यांचा समावेश होता. आम्हाला तो पक्षी माहित नव्हता. पण तणमोर असेल असे वाटले होते. या सगळ्या प्रसंगाचे वर्णन करणारे पत्र मी वर्तमानपत्रात लिहिले होते. ते पत्र मुंबईचे उल्हास राणे यांनी वाचले. ते आर्किटेक्ट आणि पक्षीमित्र होते. त्यांनी त्याची दखल घेतली आणि तो पक्षी तणमोर नाही तर जांभळी पाणकोंबडी असेल असा अंदाज व्यक्त केला. नंतर तो पक्षी जांभळी पाणकोंबडीचं असल्याचे निष्पन्न झाले. सर्वांच्या प्रयत्नांनी तेथील शिकार थांबवण्यात आम्हाला यश आले याचे समाधान आहे.

अजून एक प्रसंग आजही डोळ्यासमोर आहे. त्या दिवसानंतर आमच्या सर्वांच्या नांदुरमध्यमेश्वरला नियमित चकरा सुरु झाल्या. एकदा असेच पक्षी निरीक्षण सुरु होते. एका खंड्याने पाण्यात झेप घेतली आणि तोंडात मासा पकडून तो बाहेर आला आणि त्याच क्षणी रेड मर्लिन पक्षाने त्या खंड्यावर हल्ला करून त्याला मारले. निसर्गातील मजीवो जीवस्य जीवनमम या साखळीचा आम्ही अनुभव घेतला होता. आता नवनवीन पक्षीमित्र येत आहेत.

पण अनेकदा हौशे लोक फक्त फोटोपुरते पक्षीनिरीक्षण करतांना आढळतात. असे करतांना पक्ष्यांच्या जास्त जवळ जातात. त्यांच्या घरट्यांजवळ पोचतात. अशाने पक्षी बावरून जातात. त्यांची अंडी फुटतात. तेव्हा असे करू नये. अति उत्साहाला आवर घालावा. मपक्षी पर्यावरण रक्षीफ हे विसरू नये. त्यांचे हे स्थान अबाधित राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षीनिरीक्षण हे शांतपणे, संयमाने आणि अभ्यास करणारे क्षेत्र आहे हे लक्षात ठेवावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या