Friday, June 19, 2026
Homeमुख्य बातम्याभरदिवसा महिलेची लुट; बॅग हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास

भरदिवसा महिलेची लुट; बॅग हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात भरदिवसा एका महिलेची बळजबरीने बॅग हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १६) घडली. हनुमानवाडी येथील एसबीआय बँकेसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला

मिळालेल्या माहितीनुसार, पुनम अनिल जैन (वय ३७, रा. आडगाव शिवार) या दुपारी साडेचारच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात पायी जात होत्या. त्यावेळी ग्रे रंगाच्या मोपेडवर आलेल्या एका अज्ञात भामट्याने त्यांच्या काखेत अडकवलेली काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून घेतली. बॅग ओढून तोडत आरोपीने क्षणार्धात घटनास्थळावरून ड्रिम कॅसल सिग्नलकडे पलायन केले.

या बॅगेत दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, १ लाख २५ हजार रुपये किमतीचा अॅपल आयफोन १७ प्रो, दोन हजारांची रोख रक्कम तसेच अन्य मौल्यवान वस्तू होत्या. एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज आरोपीने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा आणि गर्दीच्या रस्त्यावर झालेल्या या धाडसी लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शहरात साखळी चोरी, मोबाईल हिसकावणे आणि महिलांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढत आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याने डोक्यावर कॅप आणि अंगात तपकिरी रंगाचा शर्ट परिधान केला होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक अर्चना वाघ आणि हवालदार नांदुर्डीकर यांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

Rahuri : लाखो शेतकरी अडकले कर्जमाफी अटींच्या कचाट्यात !

0
उंबरे | Umbare महाराष्ट्रातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकर्‍यांचे कर्जबाजारीपण सातत्याने...