शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पतीच्या जाचाला कंटाळून 38 वर्षीय विवाहित महिलेने चार मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिर्डीत 31 डिसेंबर रोजी रात्री घडली. कल्पना विजय वाकळे असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिलेचा भाऊ किरण बाबुराव पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत महिलेचा पती विजय वाकळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटना घडल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यात ठिय्या करत या घटनेतील कल्पनाचा पती विजय याच्यावर कठोर कारवाई करून त्याला शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
शिर्डी पोलीस ठाण्यात किरण बाबुराव पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बहीण कल्पना हिचा विवाह 19 वर्षापूर्वी विजय त्र्यंबक वाकळे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर हे दोघे त्यांच्या घरी धुळे येथे राहत होते. लग्नानंतर काही वर्ष त्यांचा संसार चांगला चालला. परंतु पती विजय दारू पिण्याच्या आहारी गेल्याने तेव्हापासून तो बहीण कल्पना हीस मारहाण करून शिवीगाळ व मानसिक त्रास देत रिक्षा घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत त्रास द्यायचा. तसे ती आम्हाला फोन करून नेहमी सांगायची. ती त्रासाला कंटाळून अनेकदा माहेरी यायची. परंतु तिचा पती विजय हा आमच्या घरी येऊन तिला मी तुला पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून घेऊन जायचा. बहिणीला एक मुलगा व एक मुलगी आहे.
पाच वर्षापासून धुळे येथून शिर्डी येथे राहण्यासाठी बहिण कल्पना, तिचा पती व दोन मुले शिर्डी येथील श्रीकृष्णनगर येथील चार मजली इमारतीमध्ये राहत होते. बहिणीला तिचा पती सातत्याने त्रास देत होता. 31 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेदरम्यान बहिणीचा मुलगा अभि विजय वाकळे याने मला फोन करून सांगितले, वडील विजय व आई कल्पना भांडत होते. त्याचवेळी आई कल्पना हिने आम्ही राहत असलेल्या चार मजली इमारतीवरून खाली उडी मारली आहे. ही घटना समजल्यानंतर मी लगेचच शिर्डी येथे त्यांच्या घरी येण्यासाठी निघालो. 4शिर्डी येथे आलो असता बहिण कल्पना हिला साईबाबा हॉस्पिटल हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी बहिण कल्पना हीस मयत घोषित केले. बहिणीचा पती विजय वाकळे याच्या जाचाला कंटाळून बहीण कल्पना हिने आत्महत्या केली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पती विजय वाकळे याच्या विरोधात भादंवि कलम 108, 115, 352, 351 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.