अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा ते गुंडेगाव रस्त्यावर तरुणाने एका शिक्षिकेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना बुधवारी (29 जानेवारी) सकाळी घडली. या प्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात तरुणाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ कुंडलिक खोटे (रा. खोटे वस्ती, राळेगण म्हसोबा, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी शिक्षिका राळेगण म्हसोबा ते गुंडेगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना खोटेवस्ती जवळ नवनाथ खोटे याने दुचाकीवरून येत अश्लील हातवारे करत शिक्षिकेच्या दुचाकीला कट मारला आणि अश्लील शिवीगाळ करत छेडछाड केली. दरम्यान, नवनाथ खोटे हा मागील काही दिवसांपासून वारंवार फिर्यादी शिक्षिकेचा पाठलाग करत होता.
तसेच, त्यांच्यासोबत जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेनंतर पीडित शिक्षिकेने नगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी नवनाथ खोटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार माने करीत आहेत.