मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पक्षात शिस्तभंग, गटबाजी किंवा पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला यापुढे थारा दिला जाणार नाही. पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी येथे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकू पाहणाऱ्या नेत्यांना कडक शब्दात समज दिली. नेत्यांनी पक्षात किती वर्षे काम केले यापेक्षा पक्षावाढीसाठी काय योगदान दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. एवढी वर्षे पक्षात राहून पक्ष मोठा केला का स्वतःच मोठे होण्याचा प्रयत्न केला याचेदेखील परीक्षण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागावे, असे भावनिक आवाहन केले. “समर्पण, संघर्ष आणि संकल्प” ही यंदाच्या वर्धापन दिनाची संकल्पना असून हा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीजण पक्षात राहूनच पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. पक्षाची बदनामी होणार नाही, याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी. तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव, वाडी, वस्ती, शहर, प्रभाग आणि बूथ स्तरावर संघटन उभारण्याचे आवाहन करत पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागण्याची सूचना केली. मंत्र्यांच्या कामाचे तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे त्रयस्थ मूल्यमापन केले जाईल. पक्षासाठी प्रभावी काम करणाऱ्यांनाच भविष्यात संधी दिली जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये पक्षनिष्ठा, गुणवत्ता आणि समर्पण यांना प्राधान्य दिले जाईल, असेही जाहीर केले.
येत्या काळात होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे विशेषतः शहरी भागातील मतदारसंघांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भक्कम असली तरी बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून शहरी भागातही पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवले.
सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेत पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल एजंटांनी (बीएलए) निवडणूक आयोगाच्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांशी (बीएलओ) समन्वय साधून अत्यंत अचूक, जबाबदारीपूर्ण आणि काटेकोरपणे काम करावे. पक्षाचा एकही हक्काचा मतदार तांत्रिक त्रुटी, दुर्लक्ष किंवा अन्य कारणांमुळे मतदार यादीतून वगळला जाणार नाही, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. तसेच ‘घरोघरी राष्ट्रवादी, मनोमनी राष्ट्रवादी” हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवताना नव्या आत्मविश्वासाने कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.




