अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत मयेलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी (शावर पाऊस) कोसळल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जून) ते 29 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी मयेलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
यादरम्यान अहिल्यानगरसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असेल; तर पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी मऑरेंज अलर्टफ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यांत मग्रीन अलर्टफ असेल.जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती, मात्र गुरुवारी बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभरात केवळ अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. अनेक मंडळांमध्ये अद्याप समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने, पुरेशी ओल आल्याशिवाय शेतकर्यांनी बियाणे वाया घालवू नयेत असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असून, मान्सून लांबल्यास त्याचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या पेरण्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




