Thursday, May 14, 2026
Homeक्राईमAhilyanagar : तरुणाचे अपहरण करून बंदिस्त ठेवत अमानुष मारहाण

Ahilyanagar : तरुणाचे अपहरण करून बंदिस्त ठेवत अमानुष मारहाण

खासदार आणि महिलेतील संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा राग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बंदिस्त ठेवत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर महादेव परभणे (वय 28, रा. बाणखेल, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शेती व्यवसाय करत असून 2021 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान ते एका खासदाराचे सोशल मीडिया हँडलर म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांनी संबंधित खासदारांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून फेसबुक व इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची जबाबदारी सांभाळली होती.

- Advertisement -

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित खासदार आणि एका महिलेतील मैत्रीच्या संबंधांबाबतची माहिती त्यांच्या लक्षात आली होती. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर खुलासा करणारा व्हिडिओ पोस्ट केला. यामुळे संतप्त झालेल्या काही व्यक्तींनी त्यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे भीतीपोटी ते पुण्यातील हडपसर येथे लपून राहत होते. दरम्यान, 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रणव मोरे हा तरुण त्यांना गोड बोलून पुण्यातील खराडी येथे घेऊन गेला. तेथे आधीपासूनच चार जण उपस्थित होते. काही वेळानंतर त्यांनी परभणे यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नगरच्या दिशेने नेले. शिरूरनंतर त्यांनी शिवीगाळ करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

यानंतर त्यांना चिचोंडी पाटील परिसरातील एका हॉटेलच्या मागील खोलीत डांबून ठेवण्यात आले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपींनी त्यांचे कपडे काढून त्यांना बांधून ठेवले व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना शौचालय साफ करण्यास भाग पाडले आणि अपमानास्पद व खोटे विधान करण्यासाठी दबाव टाकत त्यांचा व्हिडिओ तयार केला. 8 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांना अंभोरा (जि. बीड) पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध एका कागदावर सही घेण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर आरोपींनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असल्याने भीतीमुळे तक्रार देणे शक्य झाले नाही. त्यानंतर 29 एप्रिल 2026 रोजी एका महिलेच्या मदतीने ते अहिल्यानगर येथे पोहोचले व अखेर 4 मे रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी प्रणव मोरे, शरद पवार, मारुती कोकाटे, रॉबीन सिंग व एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरण, मारहाण, बेकायदेशीर कैद आणि जबरदस्तीचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

NEET Paper Leak : पेपरफुटीचे टेलिग्राम कनेक्शन; एक मे रोजीच प्रश्नपत्रिका...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (एनईईटी) परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यंदा या परीक्षेची (Exam)...