पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
येथील ढवळपुरी येथे ताडीने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश मधुकर बर्डे असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ताडीविक्रेत्यावर गुन्हा दाखल करावा, ताडीचा पुरवठा करणार्या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पारनेर तालुक्यातील ढवळपुरीतील रमेश मधुकर बर्डे हा युवक 25 नोव्हेंबरला वडिलांच्या दशक्रिया विधीचे साहित्य आणण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत मामाचा मुलगा अनिल गांगुर्डे हा देखील होता.
सायंकाळी रमेश याने एका घरातून ताडी पिऊन दशक्रिया विधीचे साहित्य घरी आणले. घरी गेल्यानंतर त्याला उलटी होण्यास सुरुवात झाली व उलटी झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ताडी विक्रेत्याने बनवलेली विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन या युवकाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रमेश बर्डे हा आदिवासी समाजातील असल्याने राजकीय लोक जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबत आहेत. यापूर्वी ढवळपुरी येथील शिवराम भले याने देखील विषारी ताडीचे सेवन केल्याने तो मयत झाला.
त्याचबरोबर काळू नदी, वनकुटे, गाजदीपूर, जामगाव येथील पाच ते सहा जणांचा देखील विषारी केमिकलयुक्त ताडी प्राशन केल्याने मृत्यू झाला आहे. पारनेरमध्ये विषारी ताडीने अनेकांचा जीव जात असताना पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने दक्षता घेऊन कारवाई करावी. या प्रकरणी कारवाई न झाल्यास येत्या 9 डिसेंबरला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ऊपोषण करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.