Friday, September 20, 2024
Homeक्राईमकुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाच्या खुनाचा प्रयत्न

कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाच्या खुनाचा प्रयत्न

दिल्लीगेट परिसरातील घटना || सात जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नागपंचमीच्या दिवशी भरलेल्या कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून युवकाला बंदुकीचा धाक दाखवून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनाथ छगन राठोड (वय 24 रा. वारूळाचा मारूती तालीम जवळ, नालेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी खुनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमरत्न पुलकेश भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती, नालेगाव), राहुल रोहकले (पूर्ण नाव नाही, रा. वाघ गल्ली, नालेगाव), मयुर साठे, गणेश पवार, यश पवार, ओम कंडागळे, हेमंत शेलार (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. म्युन्सीपल कॉलनी, तोफखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नवनाथ राठोड हे त्यांचे मित्र सचिन ठाणगे व प्रशांत भोसले यांच्यासोबत रविवारी (11 ऑगस्ट) रात्री 10 वाजता दुचाकीवरून दिल्लीगेट ते अमरधाम रस्त्याने जात असताना गणेश मेडिकलच्या समोर ओमरत्न भिंगारदिवे हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह थांबलेला होता. त्यांनी नवनाथ व त्यांच्या मित्राला अडवले व म्युन्सीपल कॉलनी येथे शिवछत्र बिल्डींगच्या जवळ नेले.

ओमरत्न याने नवनाथला शिवीगाळ करून, ‘नागपंचमीच्या दिवशी वारूळाचा मारूती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तु का गेला’ असे म्हणून कपाळाला बंदुक लावली. राहुल रोहकले याने नवनाथ यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. मयुर साठे याने धारदार वस्तूने पाठीवर वार केला. गणेश पवार, यश पवार यांनी लोखंडी रॉडने मांडीवर तर ओम कंडागळे, हेमंत शेलार यांनी लोखंडी रॉडने पाठीवर, कंबरेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सदरची घटना पाहून नवनाथचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. जखमी नवनाथ यांना त्यांच्या दुसर्‍या मित्राने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या