Sunday, June 14, 2026
HomeमनोरंजनZaheer Alam : ‘तुम तो ठहरे परदेशी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे...

Zaheer Alam : ‘तुम तो ठहरे परदेशी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड

नागपूर । Nagpur

“तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” नव्वदच्या दशकात या गाण्याने भारतीय संगीत विश्वात एका नव्या क्रांतीला जन्म दिला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक पानटपरी, रिक्षा आणि घराघरांत हे गाणे घुमले. या एका गाण्याने गायक अल्ताफ राजाला रातोरात सुपरस्टार बनवले, पण ज्यांच्या लेखणीतून हे अजरामर शब्द उतरले, ते नागपूरचे ज्येष्ठ गीतकार जहीर आलम ऊर्फ जहीर भाई मात्र आयुष्यभराची ‘परकेपणा’ची वेदना घेऊन अनंतात विलीन झाले. नागपूरच्या मोमीनपुरा भागातील एका छोट्याशा घरात या महान प्रतिभेने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

१९९० च्या काळात जेव्हा कॅसेटचे युग होते, तेव्हा जहीर आलम यांनी लिहिलेल्या या शब्दांनी संगीत कंपन्यांच्या तिजोऱ्या भरल्या. सुरुवातीला हे गाणे कव्वाली गायिका किरण पाटणकर आपल्या कार्यक्रमात सादर करत असत. पुढे अल्ताफ राजाच्या आवाजात याचा अल्बम आला. विशेष म्हणजे, सुरुवातीला या अल्बमला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, वर्षभरानंतर ‘तुम तो ठहरे परदेसी’ हेच शीर्षक देऊन पुन्हा हा अल्बम बाजारात आणला गेला आणि त्यानंतर जो इतिहास घडला तो आजही कोणापासून लपलेला नाही. या एका गाण्याने रेकॉर्डब्रेक विक्री केली, मात्र या यशाच्या झगमगाटात पडद्यामागील हा शब्दांचा जादूगार कायमचा अंधारात राहिला.

जहीर भाईंची जगण्याची लढाई अत्यंत कठीण होती. त्यांनी नागपूरच्या ऐतिहासिक एम्प्रेस मिलमध्ये कामगार म्हणून काम केले. पण मिल बंद पडली आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. ज्या गाण्याने कोट्यवधींचा व्यवसाय केला, त्या गाण्याचे मानधन म्हणून जहीर भाईंच्या हाती केवळ काही किरकोळ रक्कम पडली. “माझ्या शब्दांनी अनेकांना श्रीमंत केले, पण माझ्या नशिबातील दारिद्र्य दूर झाले नाही,” ही खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. मुंबईत जाऊन त्यांनी नौशाद साहेबांसारख्या मोठ्या दिग्गजांची भेट घेतली, पण तिथल्या झगमगाटात या साध्या माणसाला आपली जागा शोधता आली नाही.

जहीर आलम यांच्या आयुष्यातील एक हृदयद्रावक किस्सा त्यांच्यातील संघर्षाची दाहकता स्पष्ट करतो. एका चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले गाणे निर्मात्याला प्रचंड आवडले. पण त्या चित्रपटातील इतर गाणी एका प्रस्थापित मोठ्या गीतकाराची होती. त्या मोठ्या गीतकाराने अट घातली की, “सर्व गाणी माझ्याच नावाने जातील.” शेवटी हतबल झालेल्या निर्मात्याने जहीर भाईंना केवळ तीन हजार रुपये दिले आणि त्यांचे हक्काचे गाणे दुसऱ्याच्या नावावर प्रसिद्ध झाले. आपल्या मुलाप्रमाणे जपलेल्या शब्दांचा असा लिलाव पाहण्याचे दुःख त्यांना आयुष्यभर बोचत राहिले.

मोमीनपुरातील अरुंद गल्लीत जहीर भाईंचे छोटेसे घर होते. घरात पाहुणा आला तर त्याला नीट बसायलाही जागा नसायची. अशा वेळी ते शेजाऱ्यांच्या घरी पाहुण्यांची बसण्याची सोय करायचे. पण गरिबी असली तरी पाहुणचारात त्यांनी कधीही कसर ठेवली नाही. त्यांच्या घरी गेलेल्या व्यक्तीला ते स्वतःच्या सायकलवर बसवून मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला यायचे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनेक कलाकारांपेक्षा त्यांचे मन अधिक श्रीमंत होते.

जहीर आलम यांच्या निधनामुळे नागपूरच्या साहित्य आणि संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा हा अवलिया लेखक शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला. त्यांच्या निधनानंतर आता हळहळ व्यक्त होत असली, तरी त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या प्रतिभेची योग्य कदर समाज आणि शासनाला करता आली नाही, हेच विदारक सत्य आहे. एक अत्यंत नम्र, प्रतिभावान आणि गरिबीशी दोन हात करणारा ‘शब्दांचा बादशाह’ आज शांत झाला असला, तरी त्यांचे “तुम तो ठहरे परदेसी…” हे गाणे जोवर संगीत जिवंत आहे, तोवर जहीर आलम यांची आठवण करून देत राहील.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...