अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू होती. आधी गट आणि गणाची प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण आणि शेवटच्या टप्प्यात मतदार संख्या निश्चित करण्यात येवून पुढे निवडणूक कार्यक्रमाची प्रतिक्षा असतांना नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूका पुढे ढकल्या गेल्या. दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील आरक्षण सोडतीमध्ये अकोले तालुक्यात आणि श्रीरामपूर तालुक्यात ओबीसी आरक्षण हे 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याचा आक्षेप त्यावेळी घेण्यात आला होता.
दरम्यान, गुरूवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वोच्च निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, निवडणूका कधी जाहीर होणार, त्यापूर्वी नव्याने आरक्षण निघणार की 2025 मध्ये काढलेले आरक्षण कायम राहणार मतदार यादी कार्यक्रम नव्याने होणार का? असे प्रश्न इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पडले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता, आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. संबंधीत निकालाची लेखी प्रत निवडणूक आयोगाला मिळाल्यावर त्यानूसार अभ्यास करून निवडणूक आयोगाकडून सुचना आल्यावर पुढील प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहे. निवडणूकाबाबत आताच काही सांगता येणे कठीण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होणार असल्या तरी याबाबत अंमित निर्णय राज्य निवडणूक आयोगच घेणार आहे.
असे होते आरक्षण
जिल्हा परिषदेच्या 75 गटांचा आणि पंचायत समितीच्या 150 गणांच्या आरक्षण सोडतीमध्ये 75 गटापैकी 38 ठिकाणी महिलांचे आरक्षण होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा महिला राज असणार होते. या आरक्षण सोडतीमध्ये 75 पैकी सर्वसाधारण 39, ओबीसी 20, अनुसूचित जाती 9 आणि अनुसूचित जमाती (महिलांसह) 7 गट आरक्षीत झाले होते.
ऑगस्ट 2025 मध्ये प्रभाग रचना
जिल्हा परिषद गट आणि गणाची प्रभाग रचनेबाबत 14 ऑगस्ट 2025 मध्ये प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर त्यावर हरकती आणि सुनावणी घेवून 23 ऑगस्ट रोजी अंतिम गट आणि गणाची प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर गट आणि गणातील लोकसंख्या विचारात घेवून मतदार यादी प्रसिध्द करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती.




