नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील ‘अशोक खरात फाईल्स’ प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या घाणेरड्या कृत्यांचा खरा पुरावा असलेल्या तब्बल १६० जीबी डेटाच्या ‘न्यूड फाईल्स’ विशेष तपास पथकाच्या ताब्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओंचा समावेश असून, आपल्याच कर्मचाऱ्याच्या गरोदर पत्नीचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्यानंतर हे घबाड तिसऱ्या गुन्ह्यानंतर समोर आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी, जो खरातचा तत्कालीन कार्यालयीन कर्मचारी आहे, त्याने तपासादरम्यान पोलिसांना चार पेनड्राईव्ह सुपूर्द केले आहेत. खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी’ मधील दुष्कृत्य कर्मचाऱ्याने सुरुवातीला ६४ जीबी (गीगाबाईट्स) क्षमतेच्या ‘मूळ’ पेनड्राईव्हत साठविले. यानंतर, हा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी ३२ जीबी क्षमतेच्या अन्य तीन पेनड्राईव्हमध्ये ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचे उघड झाले आहे. या चारही पेनड्राईव्हमधील एकत्रित डेटा १६० जीबीच्या आसपास असून, त्यात अनेक महिलांचे शोषण केल्याचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे. तर, खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर तो ‘अघोरी’ विद्येचा वापर करून लोकांना गंडवत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान खरातच्या ‘ब्रह्मसदन फार्म हाऊस’वर धाड टाकली असता, तिथे ५ इंच जाडीची प्लास्टिकची पन्नी, बनावट कापडी वाघ आणि प्लास्टिकचे साप जप्त करण्यात आले आहेत.
या वस्तूंच्या साहाय्याने तो लोकांमध्ये भीती निर्माण करून अघोरी कृत्ये करत होता, असे निष्पन्न होत आहे. इतकेच नव्हे, तर बाजारातील साध्या ‘चिंचोक्यांना’ रत्नांप्रमाणे चमकवून व मंत्रवून मोठ्या किमतीत भक्तांना विकत होता, असेही उघड झाले आहे. जप्त केलेल्या ७० पानी दोन्ही रजिस्टरमध्ये सर्वच भक्तांची नावे, पत्ते आढळली आहेत. खरातकडे येणाऱ्या प्रत्येक महिला आणि पुरुष भक्ताची नोंद डायरीत केली जात असे. एसआयटीने दोन नोंदवह्या जप्त केल्या आहेत. या वह्यांमध्ये समाजातील प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ व्यक्तींची नावे असून काही गावांच्या नोंदी आढळल्या आहेत. या नोंदवह्यांच्या आधारे आता एसआयटी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या उच्चभ्रू वर्तुळात खळबळ
या संपूर्ण रॅकेटमध्ये खरातला बनावट खडे (रत्ने) पुखणारा नाशिकरोड येथील मुख्य सूत्रधार संशयित महेश कलंत्री असल्याचे निष्पन्न झाले आहे. कलंत्री हा खरातला पुष्कराज, माणिक यांसारखी बनावट रत्ने बनवून देत होता, ज्यांचा वापर करून खरात लोकांची फसवणूक करत असे. पोलीस आता कलंत्रीच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. याप्रकरणाने नाशिकच्या उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, खरातच्या ‘फाईल्स’मध्ये आणखी कोणाकोणाची नावे दडली आहेत, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ठळक मुद्दे
३२ जीबीचे तीन आणि ६४ जीबीचा एक पेनड्राईव्ह
तीन पेनड्राईव्हमध्ये प्रत्येकी १९ फोल्डर्स
एकूण १६० जीबी डेटा
डेल कंपनीचा सिल्व्हर लॅपटॉप आणि चार्जर.
पाच इंच जाडीची प्लास्टिक पन्नी, वाघाची बनावट कातडी.
‘ओकस प्रॉपर्टीज’मधील अभ्यागतांच्या नोंदीचे दोन लाल रजिस्टर.
चार पेनड्राईव्हची किंमतः २,६०० रुपये




