नाशिक | प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वांसाठी (Nashik Trimbakeshwar Sinhastha Kumbha Mela) देशभरातून रेल्वेने (Trains) दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्यांसह कुंभपर्वाच्या काळात २४ विशेष रेल्वेगाड्या (Special Trains) चालविण्याचे नियोजन केले आहे.
पहिल्या अमृतस्नानाच्या सुमारे आठवडाभर आधी या विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. गर्दीचे विभाजन करण्यासाठी नाशिकरोड हे मुख्य स्थानक नियमित रेल्वेगाड्यांसाठीच ठेवण्याचा विचार असून, विशेष गाड्या नाशिक परिसरातील अन्य स्थानकांवर येणार आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कसबे सुकेणे, खेरवडी, ओढा, नाशिकरोड आणि देवळाली या पाच रेल्वेस्थानकांच्या विकासाची कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहेत.
या स्थानकांवर भाविकांची गर्दी, वाहतूक, बस व्यवस्था तसेच स्थानकात प्रवेश निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कसबे सुकेणे, खेरवडी, ओढा आणि देवळाली या चार स्थानकांच्या पश्चिम बाजूस स्थानकाबाहेर प्रत्येकी सुमारे सहा हजार प्रवासी एकाच वेळी बसू शकतील, अशी भव्य पक्की व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कुंभपर्वावरून परतणाऱ्या भाविकांना स्थानकाबाहेर नियंत्रित पद्धतीने थांबवून त्यांना पुढील प्रवासासाठी रेल्वेगाड्यांमध्ये सोडण्याचे नियोजन या व्यवस्थेतून करण्यात येणार आहे. कुंभपर्वातून परतणाऱ्या भाविकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातूनही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर अचानक होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यास मदत होणार असून स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येणार आहेत.
कुंभपर्वांसाठी घाट रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी भाविकांच्या येण्याजाण्यासाठी आणि कुंभक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांना स्थानकाच्या पूर्व बाजूने बाहेर पडण्याची व्यवस्था असेल, तर कुंभस्थळावरून परतणाऱ्या भाविकांना पश्चिम बाजूने स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे स्थानक परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे स्थानकांच्या पूर्व बाजूस सिंहस्थ भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तसेच नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस उपलब्ध असतील, कुंभस्थळावरून भाविकांना घेऊन येणाऱ्या बस पश्चिम बाजूस थांबतील. भाविकांना उतरवल्यानंतर या बस रिकाम्या करून पुन्हा स्थानकाच्या पूर्व बाजूस आणल्या जातील. तेथून नव्याने आलेल्या भाविकांना कुंभस्थळी नेले जाणार आहे. कुभपर्वासाठी येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे मार्गनिहाय विभाजन करण्यात आले आहे.
मुंबईहून येणाऱ्या विशेष गाड्या देवळाली स्थानकावर थांबविण्यात येणार असून, तेथूनच त्या परतीच्या प्रवासासाठी रवाना होतील, नागपूर मार्गावरील विशेष गाड्या ओढा, कर्णावती मार्गावरील गाड्या खेरवडी, तर भोपाळ मार्गावरील विशेष गाड्धा कसबे सुकेणे येथे थांबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे नाशिकरोड स्थानकावर एकाच वेळी होणारी मोठी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नाशिकरोड हे नाशिकचे प्रमुख रेल्वेस्थानक असल्याने येथे नियमित रेल्वेगाड्धांची मोठी संख्या असते. त्यात कंभपर्वाच्या विशेष गाड्यांची भर पडल्यास स्थानकावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष गाड्यांचे अन्य स्थानकांवर नियोजन करून नाशिकरोड स्थानकावरील ताण कमी करण्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. कुंभपर्वाच्या काळात भाविकांना एका रेल्वेस्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जाण्याची गरज भासल्यास त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून १२ डब्यांची गाडी चालविण्याचेही नियोजन आहे. मात्र, या गाडीच्या फेऱ्या निश्चित वेळापत्रकानुसार नसून परिस्थिती आणि गर्दीचा आढावा घेऊन ठरविण्यात येणार आहेत.
गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यावर भर
सिंहस्थ कुंभपर्वाच्या काळात नाशिकमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. त्यामुळे सर्व भाविकांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरविण्याऐवजी विविध स्थानकांवर विशेष गाड्या थांबवून गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.




