नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ईदचा आनंद साजरा करून आपल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला. प्रवाशांनी गच्च भरलेली एक बस राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे फेरीवर चढत असताना थेट पद्मा नदीच्या खोल पात्रात कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ही बस ढाक्याच्या दिशेने परतत असताना दौलतदिया टर्मिनलवर ही दुर्घटना घडली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे बुधवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बस प्रवाशांना घेऊन मोठ्या फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत होती. बांगलादेशात नद्या ओलांडण्यासाठी बस आणि इतर वाहने अशा मोठ्या फेऱ्यांचा वापर करतात. मात्र, फेरीवर चढत असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट खोल नदीपात्रात कोसळली. या घटनेचा एक व्हिडीओही सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
अनेक प्रवासी बसमध्येच अडकले
दरम्यान, या अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. बस पाण्यात पडताच सगळे जण जोरजोरात ओरडू लागले. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला, मात्र दुर्दैवाने अनेक प्रवासी बसच्या आतच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. खराब हवामान आणि पाण्याच्या प्रवाहामुळे बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, बस फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटीला धडकली. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. जे ईदच्या सुट्ट्या संपवून राजधानी ढाकाकडे परतत होते.
एकाच कुटुंबातील अनेक प्रवाशांचा मृत्यू
जेव्हा बस बाहेर काढली, तेव्हा त्यातील दृश्य पाहून बचाव पथकही हादरले. बसमध्ये १४ मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळले, तर दोन महिलांचे मृतदेह बचाव पथकाला आधीच मिळाले होते. अनेक प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याने या अपघाताचे स्वरूप अतिशय विदारक होते. अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून शोधमोहिम सुरु आहे.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
दरम्यान बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घनेतील बचाव कार्याचा आढावा घेतला आहे. या भीषण अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, घाई आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.





