Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूज५०० कोटींच्या कथित ऑडिओ प्रकरणाला नवे वळण; फडणवीसांचा मोठा निर्णय, मुंबई पोलीस...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ प्रकरणाला नवे वळण; फडणवीसांचा मोठा निर्णय, मुंबई पोलीस आयुक्तांकडे सोपवली जबाबदारी

मुंबई | Mumbai
राज्यात सध्या मनोज जरांगेंनी केलेल्या ५०० कोटीच्या आरोपांवरुन मोठा वादंग सुरु झाला आहे. गेल्या आठवडाभरापसून महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटींचा दावा आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलेच गाजले आहे. आता याच प्रकरणी फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सोमवारी (26 ऑक्टोबर) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य काय? हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लीपचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचा आदेश दिलाय. आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले जाणार असून जरांगेनी आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटलांनी बीडमधील नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदा यावर भाष्य केले. भाजपच्या एका नेत्याकडून मला समजले की, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मला देण्यासाठी 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. हे पैसे शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याची कुजबुज सत्ताधारी वर्तुळात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदार यादीतून कोट्यवधी नावे वगळल्याचा आरोप; महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

ऑडिओ क्लिपमधील आवाज कोणाचा हे तपासण्यात येईल
या ऑडिओ क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे? हे तपासण्यात येईल. तपासानंतर संबंधित आरोपांमध्ये किती तथ्य आहे हेही समजणार आहे. या तपासणीत या ऑडिओ क्लीपबाबत दूध का दूध, पाणी का पाणी व्हावं अशीच अपेक्षा आहे.

काय आहे प्रकरण?
मनोज जरांगेंनी गुरुवारी (22 ऑक्टोबर) जालना येथे पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली. विधानसभा 2024 निवडणुकांदरम्यानच्या भाजपच्या एका मिटिंगचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाले असून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंमार्फत पोहोचवण्यात आले, असल्याचे सांगताना दिसत आहे. तसेच, यामध्ये इतर काही भाजपचे नेते असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. काही प्रवक्त्यांनी ही क्लिप AI निर्मित असल्याचा दावाही काही नेत्यांनी केला असून फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात...

0
नाशिक | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुशावर्त कुंड व नवीन घाट येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...