शिर्डी | Shirdi
भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचली असून, राहाता (Rahata) येथील समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० संशयास्पद खाती उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली असून, भोंदू बाबाच्या आर्थिक साम्राज्याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
या प्रकरणाचा (Case) तपास करत असताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी शुक्रवारी सिन्नरच्या जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांच्यासह सात खातेदारांची सखोल चौकशी केली. यावेळी सर्व खातेदारांनी एकच खळबळजनक दावा केला की, आम्ही कधीही बँकेत खाते उघडले नाही, ना कोणत्या कागदपत्रावर सही केली. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये वापरलेली आधार आणि पॅन कार्ड्स आपलीच असल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु या खात्यांमधील व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लोंढे पिता-पुत्रांना दणका; महासंचालक कार्यालयाकडून ‘मोक्का’ मंजूर, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
या खात्यांचा नॉमिनी स्वतः अशोक खरात असल्याने, त्यानेच ही कागदपत्रे चोरून किंवा फसवणुकीने वापरल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. तपासात असे दिसून आले आहे की, ही सर्व खाती कोविड काळात, विशेषतः २५ मे २०२१ या एकाच दिवशी मोठ्या संख्येने उघडण्यात आली होती. राहाता येथील पतसंस्थेसोबतच सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही ३२ संशयास्पद खाती आढळली आहेत. आत्तापर्यंत पोलिसांकडे १३२ संशयास्पद खात्यांची माहिती जमा झाली असून, या आर्थिक गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस आता सहकार खात्याचे मार्गदर्शन घेणार आहेत.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
दुसरीकडे, २०२२ मध्ये आत्महत्या केलेल्या एका तरुणाच्या सुसाईड नोटमध्ये अशोक खरात याचे नाव असतानाही, मूळ फिर्यादीतून त्याचे नाव वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून प्रसारमाध्यमांमध्ये गदारोळ उठल्यानंतर मयताच्या भावाने शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेऊन त्यांनी खरातचे नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली असून, त्यासंदर्भात आज औपचारिक अर्ज दाखल होणार आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा
बावके, सोनवणेंच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ
दरम्यान, जमिनीच्या फसवणुकीत (Fraud) अडकलेल्या व्यावसायिक अरविंद पांडुरंग बावके आणि किरण नानासाहेब सोनवणे या दोन आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या दोन आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. भोंदूगिरीच्या आडून आर्थिक माया जमवणाऱ्या या बाबाचे शिर्डी, राहाता आणि साकुरी परिसरातील धागेदोरे आता कापले जात असून, सहकार खात्याच्या मदतीने पोलीस आता या ‘बँकिंग जाळ्या’चा पूर्ण उलगडा करण्याच्या तयारीत आहेत. दररोज उघड होणाऱ्या या नव्या कारस्थानांमुळे नागरिकांमध्येही भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहून पतीचा चढला पारा; पत्नीला फॉर्च्यूनर कारने चिरडण्याचा प्रयत्न





