सिन्नर | विलास पाटील | Sinnar
संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह पुणे-मुंबईसारख्या महानगरांपर्यंत अगदी शेजारच्या गुजरात राज्यात (Gujrat State) खरातचे भक्त विखुरलेले होते. त्यातील काही भक्त बोटातल्या अंगठ्यांमधील हिरे-मोत्यांसाठी कदाचित हजारो रुपये मोजत असतीलही. मात्र, ईशान्येश्वर मंदिरात भक्तांकडून पैसे घेताना कधी खरातला कोणी पाहिले नाही. तरीही काही भक्त खरातवर जरा जास्तच फिदा होते. त्यांनी खरातवर करोडो रुपये उधळल्याचेही गेल्या काही वर्षांमध्ये बघायला मिळाले. त्याच्या सुरस कथाही भक्तांकडून ऐकायला मिळतात.
ईशान्येश्वर मंदिराच्या (Ishanyeshwar Temple) समोरची जवळपास पाच एकरच्या आसपास जागा एका भक्ताने स्वतः विकत घेतली आणि संस्थानला भेट दिल्याची चर्चा आजही ऐकायला मिळते. या जागेवर आज प्रशस्त सभागृहासह काही इमारती उभ्या आहेत. काही वर्षांपासून खरातचा डावा हात खांद्यापासून निखळल्याचे बोलले जाते. अपघातामुळे (Accident) हा मार लागल्याचे कुणी सांगते, तर कुणी त्याला फ्रोजन शोल्डरचा दुर्मिळ आजार म्हणते. कोणी गावाने दिलेला प्रसाद म्हणते. मात्र, हा हात हलत नव्हता. लुळा पडला होता. अनेकदा उजव्या हाताने उचलून ठेवावा लागायचा. देशात सर्वत्र उपचार घेऊनही फरक न पडल्याने एका भक्ताने खरातला थेट अमेरिकेत (America) नेऊन खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती. परतीच्या प्रवासासह शस्त्रक्रियेचा सारा खर्चही या भक्तानेच केल्याची चर्चा त्यावेळी ऐकायला मिळायची.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “खरात प्रकरणाचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे, कुणीही …”; CM फडणवीसांच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांचे धाबे दणाणले
मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या २५-३० एकर शेतीत फार्म हाऊस बांधण्याचा विचार खरातच्या मनात आला आणि एका भक्ताने तत्काळ सारा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. करोडो रुपये खर्चून अलिशान असे फार्म हाऊस बांधून तयारही झाले आहे. एखादा भक्त आपल्या गुरुवर करोडो रुपये उधळतो याचा अर्थ गुरूने त्याचा खर्चाच्या दहापट फायदा करून दिला असावा, असाही त्यातून अर्थ निघतो किंवा तुझे अमूक काम करून देतो, असे आमिष खरातने दाखवले असावे. त्याशिवाय कोणीही दुसर्याच्या बंगल्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणार नाही. खरातची तत्कालीन मुख्यमंत्री, त्यातल्या त्यात राज्याच्या नगरविकास खात्याच्या मातब्बर मंत्र्याशी असलेली जवळीकही त्यामागे कारणीभूत असू शकते. या मंत्र्याकडे अडकलेली एखादी फाईल काढून देण्याच्या बदल्यात बंगल्याचा, अमेरिका वारीचा खर्च करण्यात आला असावा. एखाद्या कामाचे टेंडर मिळून देण्याचाही शब्द सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे कदाचित खरातने दिला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
तिरुपती बालाजीचे कृष्णमूर्ती खरातला घ्यायला कधी शिर्डी विमानतळावर तर कधी ओझरच्या विमानतळावर चार्टर्ड विमान पाठवायचे, अशीही नेहमी चर्चा व्हायची. हे चार्टर्ड विमान नेहमीच दिल्लीला उड्डाण करायचे, अशीही चर्चा होती. विशेष म्हणजे याच खासगी चार्टर्ड विमानाने खरातला परत ओझर, शिर्डीला पोहोचवले जायचे, अशी त्याच्याच भक्तांमध्ये चर्चा असायची. मुंबईला जाण्यासाठी नाशिकच्या गंगापूर धरणाजवळील एका खासगी हेलिपॅडवर नेहमी एक हेलिकॉप्टर यायचे, अशीही खरातच्या भक्तांमध्ये चर्चा होती. एखाद्याने तातडीने हेलिकॉप्टर पाठवावे म्हणजे कामही तेवढे तातडीचे असावे. त्यासाठी कितीही खर्च लागला तरी तो सोसण्याची समोरच्याची तयारी असायची. काही वर्षांपासून शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांच्या, गुजरातच्या गाड्याही मिरगावकडे, ईशान्येश्वर मंदिराकडे वाढू लागल्याने खरातवरची खैरात वाढल्याची चर्चा होत होती.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरात प्रकरण तपासात फॉरेन्सिकची एन्ट्री; तीन गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास, मशिनरी, CCTV, व्हिडिओंची पडताळणी




