नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भविष्यवाणी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या ओकस प्रॉपर्टीज कार्यालयाची एसआयटीने (SIT) झडती घेतली असता, तेथून ‘हिरव्या मळकट रंगाचे’ एक संशयास्पद द्रव्य जप्त केले आहे. ते हेच गुंगीकारक द्रव्य आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना (Women) आपल्या जाळ्यात ओढत असे ? या प्रश्नाचे उत्तर आता ‘फॉरेन्सिक’ अहवालातून स्पष्ट होणार आहे.
जप्त करण्यात आलेले हे द्रव्य अत्यंत संशयास्पद (Suspicious Substance) असून, महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एसआयटीने हे नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खरातला आज सोमवारी (दि. १३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याचे नवीन कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक अत्याचार, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे (Fraud) एकूण १४ गुन्हे दाखल आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड
तर, चिंचोंक्याचे खडे बनवून देणाऱ्या महेश कलंत्री या व्यावसायिकापासून ते त्याच्या कार्यालयातील (Office) कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी पूर्ण झाली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याची कोठडी संपत असल्याने, एसआयटी आता अन्य गुन्ह्यांत त्याची पुन्हा पोलीस कोठडी (Police Custody) मागण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, खरातच्या ‘पेनड्राइव्ह’ मधील कृत्ये आणि जप्त केलेले हिरवे द्रव्य, हे दोन्ही पुरावे त्याला जन्मठेपेपर्यंत खेचण्यासाठी पुरेसे ठरतील, असा विश्वास विशेष तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
सीए पोकळेच्या तक्रारीचे काय?
या संपूर्ण प्रकरणात सीए ललित पोफळे याची ८ कोटींची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज देण्यात आला आहेत. पोकळे याने शहर पोलिसांना लेखी तक्रार देऊन चार दिवस उलटले असूनही अद्याप गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरुवातीला तक्रारच आली नाही असा पवित्रा घेणाऱ्या पोलिसांनी आता तक्रार मिळाल्याचे मान्य केले आहे. मात्र, या तक्रारीचे एफआयआरमध्ये रूपांतर होण्यास विलंब का लागतोय ? यात काही मोठे मासे वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘टॅब’ वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात ‘पार्ट-२’ टाळण्यासाठी पत्रकाराने खेळली रिस्की खेळी




