
मुंबई | Mumbai
येत्या २३ एप्रिल रोजी राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या (Baramati and Rahuri Assembly) पोटनिवडणुकीसाठी मतदान (Voting) पार पडणार असून, ०४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज (गुरुवारी) दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून काँग्रेसच्या नेत्यांशी फोनाफोनी चालू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, याकरिता राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, “बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणुकीत लढवत आहेत, तेथील एकूण परिस्थिती पाहता आणि आमच्या सगळ्यांची भावना लक्षात घेता तिकडे या निवडणुकीमध्ये पुढे जाणं थांबावं अशा प्रकारची भावना दिसली. त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचे एकमत झाले आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे असून, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत, कदाचित मलाही फोन येईल, विचारणा होईल आणि त्यांच्या कानावर टाकूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल”, असं वडेट्टीवार यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Assembly Election 2026 : आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये सकाळपासून मतदान सुरु; २९६ जागांसाठी १ हजार ९९५ उमेदवार रिंगणात
पुढे ते म्हणाले की,”बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) त्यांनीही आम्हाला वारंवार विनंती केली आहे. यापूर्वी देखील निवडणुका झाल्या आहेत. बाकी वेळी भारतीय जनता पक्षाने काही पाळले नाही. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेल्या नव्हत्या. अनेकांच्या अजितदादांबद्दलच्या भावना आहेत, नेता म्हणून असलेले प्रेम आहे, लोकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या मनात त्यांच्याबद्दल अग्रगण्य स्थान आहे, यांच्या कुटुंबातील (Family) व्यक्तीचा उमेदवारी अर्ज आहे, ही भावना अनेकांनी बोलून दाखवली. त्यामुळे नेत्यांनी चर्चा करून हायकमांडला विचारणा केलेली आहे. हायकमांडचा आदेश आला की बाकीची प्रक्रिया पूर्ण होईल, असं मला वाटतं. त्यांना विचारून आम्ही हा निर्णय घेणार आहोत”, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे आमदार सपकाळांच्या भेटीला
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी (MLA) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांची भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत त्यांनी सपकाळ यांना बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे माघार घेतात का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.




