बुलढाणा | Buldhana
बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला. सुमारे ३७० वर्षांपासूनची असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले.
गेल्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाने यंदा राज्यात यंदा ८ टक्के पाऊस कमी पडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली असतानाच आता भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांसाठी हे वर्ष पुन्हा अडचणीचे ठरु शकते.
पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल
भेंडवळच्या घटमांडणीनुसार, यंदाच्या वर्षी पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कापूस आणि तांदूळ यासह तीळ, बाजरी या पिकाचं उत्पादन यंदा भरपूर होईल, तर ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा पिक सर्वसाधारण होईल.
संपादकीय : २० एप्रिल २०२६ – नारीशक्तीचा पेच!
जूनमध्ये भरपूर पाऊस, महापुरामुळे नुकसान
भेंडवळ घटमांडणीच्या अंदाजानुसार, यंदा जूनमध्ये भरपूर पाऊस पडेल. त्यानंतर जुलैमध्ये सर्वसाधाण आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होईल. मात्र अनेक भागांमध्ये महापुरामुळे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संरक्षण स्थिती तणावात, आर्थिक स्थिती प्रतिकूल
तसेच देशाच्या संरक्षण आणि राजकीय स्थितीबाबतही भाकीत करताना यंदाच्या वर्षी संरक्षण स्थिती तणावात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या राजकीय पातळीवर सध्याचे नेतृत्व कायम राहील, मात्र तणावपूर्ण परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आर्थिक स्थिती प्रतिकूल राहील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज कसा बांधतात?
‘भेंडवळची घट मांडणी’ ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारावर देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, हवामानाचे भविष्य सांगितले जाते. वर्षभराचं भविष्य सांगण्यासाठी भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात.
या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.
घटमांडणीला शास्त्रिय आधार आहे का?
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेने बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेले नाही. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. त्यामुळे या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. यावेळी भेंडवळसह मराठवाडा, खान्देश आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आले होते.




