मुंबई | Mumbai
विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवेमुळे गोंधळ उडाला आहे. पहाटे विधान भवानात बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
या धमकीच्या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ संपूर्ण विधानसभा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी सुरुवातील विधानसभा कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने आयडी आणि तपासणी केल्यानंतर पोलिसांकडून विधानभवनातील कर्मचाऱ्यांना विधानसभेत सोडण्यात आले. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम शिंदे काय म्हणाले?
आज सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केला आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी दिली आहे, पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतली आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
पडसाद : नाशिक महापालिकेची पत वाढता वाढता वाढे!
सुरक्षा अधिकारी काळजी घेत आहेत, धमकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे. अधिकची माहिती एवढ्या लवकर उघड करणे योग्य होणार नाही. चौकशी अंती सर्व माहिती दिली जाईल, असे राम शिंदे यांनी सांगितले. तसेच शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी 6.57 मिनिटांनी धमकीचा मेल आला होता, असे राम शिंदे म्हणाले.
अधिवेशनाचे कामकाज सुरु राहणार
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आज सकाळपासूनच दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होणार होते. त्याची तयारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली आहे. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर आम्ही विधानभवनात प्रवेश केला असून लवकरच कामकाज सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधीमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.





