नाशिक | Nashik
स्वत:ला ज्योतिषी म्हणून घेणार्या अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाशिक क्राईम ब्रँच युनिट एकने अटक केली आहे. खरात (Ashok Kharat) हा लोकांचे भविष्य सांगत होता. तसेच त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी येत होते. मात्र, आता त्याला अटक झाली असून, याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक; पोलिसांना सापडले तब्बल ५८ व्हिडीओ
अंनिसने निवेदनात म्हटले आहे की, “खरंतर मागील तब्बल २५ वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर तसेच इतरत्र बड्या लोकांना भविष्य वर्तवण्याचा बहाणा करून त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले असल्याची महाराष्ट्र अंनिसला दाट शंका होती. म्हणून त्याच्या आजपर्यंतच्या सर्व गैर कृत्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. मोठे-मोठे प्रतिष्ठित लोक तसेच बडे राजकीय नेते मंडळी या भोंदूच्या पाठीमागे असल्याने त्यांचे त्याला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे. त्यामुळे त्याने नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात हा ज्योतिष सांगण्याचा आणि विविध धार्मिक कर्मकांड करण्याच्या नावाखाली लोकांचे विशेषतः महिलांचे शोषण करण्याचा उद्योग वाढवला”, असे त्यात म्हटले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर
तसेच “नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (CM) त्यांच्या काही सहकाऱ्यांसह ज्योतिष जाणून घेण्यासाठी सदर भोंदूकडे गेले असल्याचे समजले होते. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसने ही बाब उघड केली होती आणि निषेध नोंदवला होता. तरीही या भोंदूवर त्यावेळी काहीही कायदेशीर कारवाई झाली नाही. कॅप्टन अशोक खरात यांनी जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचे महाराष्ट्र म्हणणे आहे. ह्या भोंदूकडे ५८ रहस्यमय व्हिडिओ सापडल्याचेही समजते. त्यामध्ये अनेक बड्या बड्या हस्ती तसेच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची दाट शंका आहे. त्यामुळे साहजिकच पोलिस तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येण्याचाही दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण अतिशय सावधगिरीने या भोंदूच्या विरोधातले सर्व सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह ह्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालेल्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही अंनिसने निवेदनात म्हटले आहे. असे घडल्यास आज मितीला जोरात सुरू असलेल्या ज्योतिषांच्या भंपकबाजीला आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. तसेच लोकांमध्येही ज्योतिषाचा फोलपणा लक्षात येईल, अशी अपेक्षा देखील अंनिसने व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘स्वघोषित कॅप्टन’ने स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
महिलेने फिर्यादीत काय म्हटलंय?
स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात देण्यात आलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले की,”स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास संपादन केला. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.
स्वयंघोषित कॅप्टन खरात हा भोंदू आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्या ट्रस्टवर असतील तर सामान्य पीडित महिलेला न्यास कसा मिळेल? शिवाय माजी मुख्यमंत्री व इतर मंत्री त्याचे अंधभक्त असल्याने पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे.पण आम्ही जोरकसपणे पाठवुरावा करू.
कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस





