जम्मू-काश्मीर | Jammu Kashmir
जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात भीषण अपघात घडला. खगोट भागात भरधाव बस अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले. रामनगरजवळील कनोते गावाजवळून ही बस जात असताना हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उंचावरील डोंगराळ रस्त्यावरून जात असताना एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यासाठी धावले. घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींनाही उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिकही मदतीला धावले आहेत.
सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक जखमींनींची प्रकृती चिंताजनक आहे. बस उधमपूरच्या दिशेने जात असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या घटनेवर नायब राज्यपाल (LG) मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं की, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी पीडित कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.”
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूरमधील रामनगरमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी दुर्घटनेविषयी माहिती घेत आहो. उपायुक्तांशी बोलणं झालं आहे. प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत’. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढे म्हटले की, रामनगरहून ऊधमपूरला जाणाऱ्या सरकाराच्या बसचा अपघात झाला. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे’.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिप्ट करण्याची व्यवस्था केली जात आहे. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी वाहतूक इतरत्र वळवली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली जात आहे. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेतेय, हे पाहावे लागेल.





