मुंबई | Mumbai
रविवारी मुंबईत आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनावरून ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेकायदेशीररित्या जमाव जमवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल
आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, परवानगी नसताना आंदोलन करणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून ठाकरे बंधूंसोबत असलेल्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या आंदोलकांना सोडवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे थेट रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा विरोध करत पोलिसांच्या गाड्यांसमोर धाव घेतली होती. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
A case has been registered against Shiv Sena (UBT) leader and MLA Aaditya Thackeray and MNS leader Amit Thackeray at the Shivaji Park police station in Mumbai. During a protest at Shivaji Park yesterday, when the police began detaining people, Aaditya Thackeray and Amit Thackeray objected to the action and joined the protest themselves. Following this, the police registered a case against both of them: Mumbai Police— ANI (@ANI) October 12, 2026
३०० आंदोलकरांवर गुन्हे दाखल
गुन्हा नोंद झालेल्या नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अनिल परब, महेश सावंत, वरुण सरदेसाई, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार , सुनील प्रभू यांसह ठाकरेंचे काही पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या आंदोलनादरम्यान परिस्थिती चांगलीच तापल्याचे पाहायला मिळाले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे थेट मैदानात उतरले होते. सेना भवन परिसरात आदित्य ठाकरेंनी ठिय्या दिला होता, तर आंदोलकांच्या सुटकेसाठी हे दोन्ही नेते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. दरम्यान आता आंदोलकांनी भरलेली पोलीस बस अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.




