मुंबई | Mumbai
ओला-उबर, रॅपिडोसह ॲप आधारित प्रवासी सेवा देणारी वाहने सध्या परिवहन विभागाच्या रडारवर आली आहे. टॅक्सी-ऑटो रिक्षानंतर आता ॲप-आधारित प्रवासी वाहनांवरही परिवहन विभाग कारवाई करणार आहे. ओला-उबर, रॅपिडोसह (Rapido) सर्व ॲप-आधारित प्रवासी सेवांसाठी नवी नियमावली परिवहन विभागाकडून लागू करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ॲप आधारित ( ओला, उबेर, रॅपिडो आणि इतर) वाहनांसाठी हे नवे नियम लागू राहणार आहेत.
ॲप आधारित वाहनांसाठी नवी नियमावली खालीलप्रमाणे
नव्या नियमावलीनुसार ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना बंधनकारक.
- चालकांकडे वैध परवाना, बॅच आणि व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य.
- तसेच बॅचसाठी अर्ज करताना मुंबई किंवा त्या त्या शहराचा 15 वर्षांचा रहिवाशी दाखला आणि पोलिस पडताळणी पत्रही राहणार अनिवार्य.
- चालकांना सलग 12 तासांपेक्षा अधिक वाहन चालवता येणार नाही.
- चालकांना एकूण भाड्याच्या किमान 80% रक्कम देण्याची तरतूद.
- वाहनांचे GPS ट्रॅकिंग, चालक पडताळणी आणि ऑनलाइन देखरेख केली जाणार.
- ॲप व वेबसाइट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असणे बंधनकारक.
- बनावट कागदपत्रांवर परवाना घेतलेल्या चालकांवर परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई केली जाणार.
- Nashik Crime News: तू मध्ये आला, अगोदर तुलाच मारतो, कोयत्याने वार करत थेट गच्चीवरुन ढकलून देत खून
मराठी अनिवार्य
गेल्या तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या परिवहन विभागाने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केले होते, त्यानुसार नियमही केला होता. त्यानंतर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती. या अभियानाद्वारे राज्यातील १ लाखांहून अधिक अमराठी वाहनचालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले होते.
दरम्यान, यापुढे मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या चालकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणे अनिवार्य असेल. नव्या नियमानुसार मराठी न येणाऱ्या चालकाला सुरुवातीला एक महिन्याची नोटीस देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. नोटीस देऊनही मराठी न शिकल्यास चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केले जाईल.




