नाशिक | प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान मानवाच्या मदतीसाठी विकसित होत असतानाच सायबर गुन्हेगारीच्या जगात मात्र या तंत्रज्ञानाने भयानक रूप धारण केले आहे. भारतातील तब्बल ७२ टक्के संस्थांवर एआय आधारित सायबर हल्ले झाले असून, गेल्या वर्षभरात विविध कंपन्यांना १६०० कोटी रुपयांची खंडणी सायबर गुन्हेगारांना द्यावी लागली आहे, महाराष्ट्र सायबरने ऑपरेशन न्यूरल रिफ्ट या अहवालात अनेक खुलासे केले आहेत.
या अहवालानुसार, सायबर विश्वात क्लॉड मायथॉस नावाचे नवे स्वयंचलित अस्त्र सक्रिय झाले असून, यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची बँकिंग तिजोरी आणि रोजच्या वापरातील यूपीआय पेमेंट सिस्टिम हॅकर्सच्या रडारवर आली आहे. क्लॉड मायथॉस हे एका कंपनीच्या प्रोजेक्ट ग्लासविंग अंतर्गत विकसित केलेले प्रगत एआय मॉडेल आहे. ते कोणत्याही सॉफ्टवेअरमधील लपलेले तांत्रिक दोष स्वतःहून शोधून काढते. कोट्यवधी ऑटोमेटेड टेस्ट करूनही ज्या यंत्रणांमधील दोष सायबर तज्ज्ञांना सापडले नाही, तेथे या एआय मॉडेलने अवघ्या काही सेकंदात तब्बल २७ वर्षे जुने ओपन बीएसडीमधील गुप्त दोष हुडकून काढले आहेत. या मॉडेलने आतापर्यंत ६ हजारांहून अधिक अति-धोकादायक तांत्रिक त्रुटी स्वतःहून शोधल्या आहेत. जर हाच तंत्रज्ञानाचा वेग हॅकर्सच्या हाती लागला, तर देशाची डिजिटल अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडू शकते, अशी भीती आहे.
दरम्यान, मायथॉसच्या रूपाने आलेल्या या आव्हानाची दखल घेण्यात आली. दरम्यान, सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक रहावे आणि कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या शासकीय हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
अहवाल काय सांगतो?
- रॅन्समवेअर म्हणजेच खंडणीखोर सॉफ्टवेअरच्या हल्ल्यांमुळे भारतातील ६५ टक्के कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले होते.
- कोणताही पर्याय न उरल्याने सायबर हल्ल्याला बळी पडलेल्या २० टक्के कंपन्यांनी गुन्हेगारांची मागणी पूर्ण करत कोट्यवधी रुपयांची खंडणी दिली.
- सायबर विळख्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काय आहे रडारवर व कोणत्या श्रेणीत
- कोअर बँकिंग आणि यूपीआय इन्फ्रास्ट्रक्चर : अत्यंत संवेदनशील.
-इंटरनेट-मोबाइल बैंकिंग आणि एटीएम नेटवर्क : अतिधोकेदायक
-सरकारी डेटा आणि नागरिक सेवा पोर्टल्स : अतिधोकेदायक
हॅकर्सच्या आधी पोलीस सञ्ज !
महाराष्ट्र पोलिसांनी या संकटाचा सामना करण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत. महाराष्ट्र सायबरचे अपर पोलीस महासंचालक यशस्वी यादव, डीआयजी संजय शिंत्रे आणि एसपी संजय लाटकर, अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने ऑपरेशनल सिक्युरिटी रोडमॅप तयार करण्यास सुरुवात केली आहे. हॅकर्सनी हल्ला करण्यापूर्वीच सिस्टिममधील खिंडारे शोधून ती बुजविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आता बँकिंग क्षेत्रासोबत मिळून तांत्रिक उपाय मजबूत करत आहेत.




