मुंबई | Mumbai
राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतामधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांची पाटी कोरी करून नवा इतिहास लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच एका ध्येयाने आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने एक निर्णय घेतला की, आम्ही ४८ हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललो आहे. मात्र, आमच्या महायुतीतील काही सहकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी यावर सविस्तर चर्चा केली, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.
Jayant Patil: अर्थमंत्रीपदी वर्णी लागणार का? जयंत पाटलांचं हसत हसत उत्तर, म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा…
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेलं आश्वासन आपण पूर्ण केलं. राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, २०२९ ला कर्जमाफी करु, असा विचार करता आला असता. मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारणासंबंधी नाही. ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ५० हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. २००८ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, त्यांना २००९ मध्ये वगळले. २०१७ ला झाली त्यांना २०१९ मधून वगळलं. समितीने आपल्या अहवालात सांगितलं शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची सवय सुटली, किंवा वाटलं कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, अशात मग कर्ज भरत नाहीत. त्यामुळे लगतच्या कर्जमाफीचा फायदा देऊ नये असा निर्णय होता. यात १२ लाख शेतकरी आहेत, मग ५० हजारांचा फायदा दिला तर ६ लाख लोकांना फायदा होत होता. त्या अहवालाच्या पलिकडे जात विचार केला, ५० हजार आपण द्यावे. १२ लाखातले ९ लाख शेतकरी १०-१२ हजार भरुन पात्र होत होते. चालू कर्ज शेतकऱ्यांनी भरावे याची अट आपण लावली होती ती रद्द केली,” असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “मागेल त्याला शेततळे योजना आणली. लाखो शेततळी आपण तयार केली. अनेक जिल्हे मराठवाड्यातील आहेत, तिथे शेततळे दिसतात. एलनिनोमध्ये ५-६-७ जुलैला पाऊस असेल आणि थेट २५ जुलै नंतर पाऊस असेल तर मग अशी शेततळी कामी येतात. गटशेतीची योजना देखील आपण सुरु केली. ५० हजार गट सुरु केले तर गुंतवणूक क्षमता वाढते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत पिकं घेता येतात आणि शेती फायद्यात आणता येते,” असे ते म्हणाले.
‘देवाभाऊंचं’ सरकार आहे! आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो
विरोधकांवर थेट हल्ला करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “अनेक विरोधकांना वाटत होतं की शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांचं राजकीय दुकान नेहमीच चालू राहील. पण ते बहुधा विसरले की, हे ‘देवाभाऊंचं’ सरकार आहे! आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो,” असा घणाघात त्यांनी केला.
एखाद्या खोलीत बसून निर्णय घेणारा मी नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी देखील शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. आजही आमच्या शेतात धानाची शेती होते. वयाच्या पंचवीशीपर्यंत मी ३ महिने शेतातच असायचो. मी पण लहानपणापासूनच शेतात गेलो आहे, शेती बघितली आह. एखाद्या खोलीत बसून निर्णय घेणारा मी नाही. हे सगळं आम्ही बघितलय, काही लोकांना वाटतं की आम्ही शहरातून निवडून येतो तर आम्हाला काही समजत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.




