मुंबई | Mumbai
पुण्यातील नसरापुरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने अख्खा देश हादरला होता. या प्रकरणात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (65) याला विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.
शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी म्हटले, आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाच पर्याय सोडला नाही. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. पीडित मुलगी अवघी ३ वर्षांची होती. लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. कृत्य आरोपीनेच केल्याचं सिद्ध झाले आहे. हत्येनंतरही आरोपीने अत्याचार सुरूच ठेवला. या प्रकरणात १५ दिवसांत आरोपपत्र दाखल झाले. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे. ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे असे न्यायाधीश म्हणाले.
निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
नसरापूर प्रकरणी अखेर फाशीची शिक्षा!
नसरापूर प्रकरणातील निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मा. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रकरणाचा अतिशय वेगाने व प्रभावीपणे तपास पूर्ण करून विक्रमी वेळेत न्याय मिळवून देणाऱ्या पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक, सरकारी वकील अजय मिसर आणि सर्व तपास यंत्रणांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
सरकारी वकिलांनी काय युक्तिवादात काय म्हंटले?
न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली.




