नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्राच्या सहकार्याची गरज यावर चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ही बैठक राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली, ज्यात महामार्ग, रेल्वे, मेट्रो व नदीजोड प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतल्याचे नमूद केले. त्यामुळे फडणवीस लवकरच केंद्रात जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना पुन्हा जोर आला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. राज्यातील प्रशासन आणि प्रकल्प यासंदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारचे काही प्रकल्प सुरु आहेत त्याची माहिती मी त्यांना दिली. एकूणच केंद्र सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे ते मी त्यांना सांगितलं. आम्ही जेव्हा मदत मागतो, चर्चा करतो तेव्हा ती चांगली चर्चा होत असते. तशी आजही ती चर्चा उत्तम प्रकारे झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
माजी प्रदेश महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं! विजय चौधरींची भाजपमधून हकालपट्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिथारमन यांची भेट घेतली. सी-लिंक प्रकल्पासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाची आवश्यक परवानगी मिळावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. तसंच मी भुपेंद्र यादव यांनाही भेटलो. पर्यावरण आणि वनं यासंदर्भातल्या काही मंजुरी आहेत त्याची माहिती मी त्यांना दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अनेक रिकामटेकडे लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतं, त्यांना आनंद घेऊ द्या
तुम्ही दिल्लीत आल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिल्लीत असलो तरीही चर्चा होतात. मुंबईत असलो तरीही चर्चा होतात. मला वाटतं आहे की अनेक रिकामटेकडे लोक आहेत त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतं त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्या कुणाला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, जी काही पतंगबाजी करायची आहे ती करुद्या. मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आहे आणि ती करत राहणार आहे. अनेक लोकांना वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.




