मुंबई | Mumbai
पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा (Shetkari Kamgar Party) ७८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. या मेळाव्यास मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हजेरी लावली. यावेळी बोलतांना त्यांनी मराठी आणि हिंदीच्या वादावर भाष्य करत ‘महाराष्ट्रात (Maharashtra) लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल, शिकवता येईल याचा विचार मुख्यमंत्री करतांना दिसत आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी माध्यमांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “माझं अतिशय पक्क मत आहे की, महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे. ती अनिवार्य असली पाहिजे, ती अनिवार्य आपण केलीच आहे. पण, महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेच्या पायघड्या घालायच्या त्या मानसिकतेला माझा विरोध आहे”, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या मराठी भाषेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
हे देखील वाचा : Raj Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतायत – राज ठाकरे
तसेच जनसुरक्षा कायद्यावर बोलतांना राज ठाकरेंनी आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी. आम्हाला फक्त अटक करून दाखवा, असे म्हणत सरकारला आव्हान दिले होते. त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केले. ते म्हणाले की, “हा कायदा त्यांच्याकरता बनलेला नाही. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाहीत त्यामुळे तुमची अटक करायचे कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे. त्यासाठी हा कायदा नाही. अशा प्रकारची वक्तव्य ही कायदा न वाचता केलेली आहेत,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.




