मुंबई | Mumbai
सध्या इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाची जगभर चर्चा सुरु आहे. या देशांमध्ये संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणावर ड्रोनने हल्ला करण्यात येत आहे. शस्त्राचा अचूक आणि भेदक मारा करण्यात येत आहे. दूरवरून एखादे लक्ष्य अचूक टिपण्यात येत आहे.जर्मनीतील संरक्षण क्षेत्रामधील एका कंपनीने तर अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. मनुष्यरहित AI आधारीत शस्त्रांच्या निर्मितीचा आणि उत्पादनाचा प्रयत्न ही कंपनी करत आहे. आगामी काळात जिवंत झुरळ शत्रूच्या बंकरमध्ये घुसून हेरगिरी करताना दिसतील. जर्मनीमधील हेल्सिंग या स्टार्ट-अप कंपनीकडून झुरळांची सेना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
झुरळ-सायबॉर्ग्स
जर्मनीमधील शास्त्रज्ञ झुरळांचे रोबोटमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांचा वापर हेरगिरी आणि लष्करी मोहिमांमध्ये केला जाऊ शकेल. जिवंत झुरळांच्या पाठीवर अत्यंत लहान इलेक्ट्रॉनिक ‘बॅकपॅक्स’ (पिशव्या) जोडल्या जातात. यांना “झुरळ-सायबॉर्ग्स” (cockroach cyborgs) असेही संबोधले जात आहे. या बॅकपॅक्समध्ये सेन्सर्स, कॅमेरे आणि दळणवळण यंत्रणा बसवलेल्या असतात; ज्यामुळे या झुरळांना शत्रूच्या हद्दीत घुसखोरी करून गुप्त माहिती गोळा करणे शक्य होते.
Nashik Crime News: महात्मा फुले चौक परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून तीन ते चार वाहनांची तोडफोड
या कंपनीचे CEO स्टेफन विल्हेल्म यांच्या मते बायो-रोबोट स्वॉर्ममध्ये काम करेल. म्हणजे एकाचवेळी कॉकरोचची फौज शत्रू राष्ट्रात घुसवता येईल आणि माहिती जमा करता येईल. झुरळाच्या पाठीवर मिनी सेन्सर असेल. त्यातून सुरक्षित संवाद साधता येईल. हा छोटा जीव एक मोठे ऑपरेशन सहज पेलेल आणि ते तडीस नेईल. जर्मनी संरक्षण खात्याचा चेहरा अमुलाग्र आणि बेमालूमपणे बदलवत असताना या झुरळाच्या फौजेची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
या झुरळांच्या पाठीवर जोडलेल्या सूक्ष्म सेन्सर्स, कॅमेरे आणि दळणवळण मॉड्यूल्ससह विविध प्रकारची उपकरणे बसवलेली असतात. ही यंत्रणा तात्काळ माहिती प्रसारित करण्यास आणि सभोवतालच्या वातावरणाविषयी माहिती गोळा करण्यास सक्षम असते. शिवाय, शास्त्रज्ञ या झुरळांच्या हालचालींवर नियंत्रणही ठेवू शकतात. हे काम सौम्य विद्युत संकेत पाठवून साध्य केले जाते; ज्यामुळे एखादा चालक दूरवरूनच झुरळाच्या हालचांची दिशा नियंत्रित करू शकतो. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने, हे कीटक एकत्रितपणे एका “थव्याप्रमाणे” काम करू शकतात; ज्यामुळे मोठ्या क्षेत्रांवर पाळत ठेवणे अधिक सुलभ होते.
झुरळांची निवड का केली?
शास्त्रज्ञांच्या मते, झुरळ हे निसर्गातील सर्वात कणखर आणि टिकाऊ जीवांपैकी एक आहेत. ते अत्यंत अरुंद जागेतूनही सहजपणे वाट काढू शकतात आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत राहू शकतात. याव्यतिरिक्त, त्यांच्या शरीरावर हलकी उपकरणे वाहून नेण्याची शारीरिक क्षमताही असते. त्यांच्या पाठीवर सुमारे 10 ते 15 ग्रॅम वजनाचा सूक्ष्म बॅकपॅक बसवता येतो, ज्यामध्ये कॅमेरे आणि सेन्सर्ससारखी उपकरणे मावू शकतात.
झुरळाचं हे नवीन तंत्रज्ञान केवळ युद्धच नाही तर नैसर्गिक संकटातही मदतीला येणार आहे. नैसर्गिक संकटात जसे भूकंप, भूस्खलन, खाण, सुरूंग, जंगलातील अडचणीच्या काळात झुरळाची मदत मिळणार आहे. तर एखाद्या इमारतीत लोक अडकले असतील. आणीबाणीची परिस्थिती असेल अशावेळी हे झुरळ मदतीला येणार आहे. तर संकटात अडकलेली माणसं, कुठे फसलेली माणसं शोधण्यासाठी झुरळांचा वापर होणार आहे.





