नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पूजाविधीच्या नावाखाली भक्तांना लुटणारा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) ऊर्फ कॅप्टन याच्या काळ्या कारनाम्यांचा आवाका आता नाशिकच्या (Nashik) सीमा ओलांडून मुंबई आणि शिर्डीपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील (Mumbai) एका बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या नावे बनावट बँक खाते उघडून तब्बल २ कोटी लाख रुपयांची बेकायदेशीर आर्थिक उलाढाल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता नाशिककडून शिर्डी पोलिसांकडे सरकल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या प्रकरणी राहता पोलिसांनी खरातसह समता पतसंस्थेच्या तत्कालीन मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दिनेश परब यांची १४ वर्षांपूर्वी खरातसोबत ओळख झाली होती. परब यांना देवदर्शनाचे बुकिंग करून देतो, असे आमिष दाखवून खरातने त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो मिळवले. या कागदपत्रांचा आधार घेऊन खरातने समता नागरी सहकारी पतसंस्थेत परब यांच्या नावे बनावट खाते उघडले. या खात्यावर परब यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या खात्यावर खरातने स्वतःचे नाव वारसदार म्हणून लावले आणि व्यवहारांचे मेसेज फिर्यादीला जाऊ नयेत म्हणून स्वतःचा मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडला.
हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात
या घोटाळ्यात (Scam) समता पतसंस्थेच्या तत्कालीन मॅनेजरची भूमिका संशयास्पद ठरते आहे. खातेदार प्रत्यक्ष हजर नसताना आणि कोणतीही कायदेशीर पडताळणी न करता इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार होऊ दिले गेले. या खात्यासाठी विनोद दादासाहेब बनकर याला ओळखीचा साक्षीदार दाखवण्यात आले होते. जेव्हा पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासासाठी काही खातेदारांना नोटिसा बजावल्या, तेव्हा परब यांना आपल्या नावे असा व्यवहार झाल्याचे समजले आणि हे बिंग फुटले.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिककरांना दिलासा; शहरातील वृक्षतोडीला ‘या’ तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती
आता शिर्डी तपासाचे केंद्र!
संशयित खरातविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत ११ गुन्हे नोंद आहेत, ज्यात आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. मात्र, आता शिर्डी पोलिसांनी सावकारीच्या गुन्ह्यात इतर संशयितांना अटक केल्याने तपासाचे केंद्र नाशिकऐवजी शिर्डी ठरत आहे. राहाता पोलिसांत दाखल झालेल्या या नव्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपासही आता शिर्डी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. खरातविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या आता तेरा वर पोहोचली असून, एसआयटीने महाराष्ट्र पोलिस अकादमीत मुक्काम ठोकून तपासणीचे सत्र सुरू केले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी





