मुंबई | Mumbai
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसला आज दादरमध्ये अपघात झाला आहे. दादर येथील प्लाझा सिनेमा येथील कोतवाल उद्यानाजवळ एक बेस्ट बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात चार पादचाऱ्यांना धडक बसली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहें. अपघातामुळे कंत्राटी चालकाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्तात उभ्या असलेल्या जेसीबीवर बस आदळली आहे.
प्लाझा टॉकीजजवळ कायमच गर्दी असते. हा परिसरा वर्दळीचा परिसर असल्याने या ठिकाणी वाहनांची सुद्धा मोठी गर्दी असते. त्यातही कोतवाल गार्ड हे बेस्ट बस थांबण्याचेही ठिकाण आहे. असे असतानाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास बेस्ट बस क्रमांक 463 च्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला.
यावेळी बस चालकाचे बसवरील असे काही नियंत्रण सुटले की या बसची तीन दुचाकी, एक चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. ज्यानंतर ही बस त्या ठिकाणी असलेल्या जेसीबीला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
दादरसारख्या वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने खळबळ उडाली. या अपघातामध्ये २२ ते २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर, ऋषभ गुप्ता (वय २५ ते ३०) यांच्या डोक्याला मार लागला असून प्रकृती चिंताजनक आहे. तर, सतीश वाघमारे (वय ४८) बेस्ट बसचे निरीक्षक आणि महेश डोईफोडे (वय ५०) हे जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आणि कामावर जाण्यासाठी लोक बाहेर पडण्याच्या काळातच हा अपघात घडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.




