छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणाची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. तर, दुसरीकडे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या जबाबात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh), सचिन वाझे (Sachin Waze), अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi), दिनो मोरिया (Dino Morea) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांच्यासह इतरांची नावे असल्याचे वृत्त आहे. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा…
उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझेही नाव आहे. तुमचेही येईल. दुरान्वयेही संबंध नाही. ओळख पाळख नाही. किती काळ सहन करत राहणार. नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. का म्हणून नाव घेतले जातंय. आम्ही गप्प होतो. फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जावू. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही
उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझे नाव सालियान प्रकरणात घेतले जात आहे. पण मी ‘असे प्रश्न विचारू नका’ असे म्हणणार नाही. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. परंतु, जर आमच्यावर सतत बिनबुडाचे आरोप केले जात असतील, तर आम्ही उत्तर का देऊ नये? आज आमची नावे घेतली जात आहेत, उद्या तुमचीही सगळी नावे ही लोक घेऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंनी काय पोस्टमध्ये काय म्हंटले?
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.




