मुंबई | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने दुष्काळाच्या संदर्भातील उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरूच आहे. याशिवाय शेतकऱ्यांना थेट मदत, पिण्याचे पाणी, चारा आदी सर्व उपाययोजना यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली.
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न या विद्यापीठाच्या मुंबई कॅम्पसचे उदघाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपाययोजनांबाबत माहिती दिली. दुष्काळी उपाययोजनांबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. एनडीआरएफ अंतर्गत केंद्राची मदत आपल्याला घ्यायची आहे. परंतु, केंद्राची अपेक्षा ५ ऑक्टोबर नंतर पंचनामे सुरू करण्याची असते. पण त्यासाठी न थांबता आताच त्याची तयारी आपण सुरू केली आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात शेतकरी कर्जमाफीची योजना सुरू आहे. त्यात आपण तीन याद्या जाहीर केल्या असून योजनेत जितके शेतकरी पात्र ठरतील त्या सगळ्यांना मदत करणार आहोत. राज्य सरकारने दुष्काळी स्थिती गांभीर्याने घेतली आहे. शरद पवार यांनी सरकारला पत्र पाठविले ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी याबाबत अधिकच्या सूचना केल्या तर त्या देखील निश्चित सरकार ऐकेल, असेही फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींची मानसिकता अराजकवादी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसचे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावरून भारत निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, राहुल गांधी अराजकतावादी मानसिकतेचे बनले आहेत. आपला पराजय लपविण्यासाठी ते हे करत आहेत, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.
भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले हे ते स्वीकारत नाहीत. जखम कपाळाला आहे पण ते पट्टी गुडघ्याला बांधत आहेत. भारतीय संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करायचे. लोकांचा त्या संस्थांवरचा विश्वास उठला पाहिजे, मग लोकशाहीवरचा विश्वास उठला पाहिजे. भारतीय संविधानावरील विश्वास उठला पाहिजे, असे त्यांचे कार्य असते. संविधान हातात घेऊन लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशी पेरणी ते करत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.




