नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
२०१९ मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई संघर्षात शौर्य गाजवणारे आणि त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात तीन दिवस राहिलेले भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन वीर चक्र प्राप्त अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय हवाई दलाचा निरोप घेतला आहे. हवाई दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी एका खासगी विमानसेवेसोबत आपल्या कारकिर्दीचा नवीन अध्याय सुरु केला आहे. 2019 मध्ये पाकिस्तानसोबतच्या हवाई लढाईत त्यांनी शत्रूचे विमान पाडले होते. यानंतर ते तीन दिवस त्या देशात कैदेत होते. दरम्यान, वर्धमान यांना 2021 मध्ये वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अभिनंदन वर्धमान यांनी २०१९ मध्ये भारताच्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर झालेल्या हवाई संघर्षादरम्यान पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. त्यांनी ऑगस्ट महिन्यात या विमानसेवा कंपनीत प्रवेश केला. भारतीय हवाई दलातील (IAF) त्यांच्या गौरवशाली कारकीर्दीनंतर, ज्यात बालाकोट हवाई हल्ल्यानंतरच्या हवाई लढाईतील त्यांच्या भूमिकेचाही समावेश आहे. त्यांनी व्यावसायिक विमानसेवेच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांची हवाई दलातील सेवा या वर्षी 31 मार्च रोजी पूर्ण झाली आणि त्यानंतर ते प्रादेशिक विमानसेवा पुरवणाऱ्या ‘Fly91’ या खाजगी कंपनीत रुजू झाले.
गोवास्थित FLY91 ने मार्च 2024 मध्ये आपल्या विमानसेवा सुरू केल्या. ही एअरलाइन सध्या सहा ATR 72-600 विमानांचे संचालन करते. तिचे दोन मुख्य तळ गोवा आणि हैदराबाद येथे आहेत.
अभिनंदन वर्धमान यांना २०२१ मध्ये ‘वीर चक्र’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते. हा युद्धकाळात दिला जाणारा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रकात हवाई संघर्षादरम्यान ‘कर्तव्याप्रती असाधारण समर्पण’ दाखवल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आल्याचा उल्लेख होता.
अभिनंदन वर्धमान भारतीय वायुसेनेत विंग कमांडर पदावर कार्यरत होते. ते MiG-21 बाइसन स्क्वाड्रनमध्ये तैनात होते आणि श्रीनगर एअर फोर्स स्टेशनवर ‘ऑपरेशनल रेडीनेस प्लॅटफॉर्म’ ड्युटीवर होते. त्याच वेळी पाकिस्तानी एअरफोर्सच्या अनेक फायटर जेट्सचा एक समूह एलओसी (Line of Control) च्या दिशेने पुढे सरकताना दिसला.
शत्रूच्या विमानांचा ताफा दिसल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांतच अभिनंदन वर्धमान यांना त्यांना रोखण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी शत्रूच्या फायटर जेट्सना मागे पिटाळून लावले आणि त्यांचा पाठलाग केला. या हवेतील धुमश्चक्रीत अभिनंदन यांनी F-16 विमान मारून पाडले. मात्र, या प्रसंगाच्या वेळी शत्रूच्या एका विमानाने BVR मिसाइल्स डागल्या, ज्यातील एक मिसाइल त्यांच्या विमानाला लागली. यामुळे त्यांना शत्रूच्या हद्दीत ‘इजेक्ट’ व्हावे लागले होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली.




