दिंडोरी | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल सकाळपासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पुनरागमन केले आहे. संपूर्ण तालुक्यात काल सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या दमदार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून, सुस्तावलेल्या शेतीकामांनी आता चांगलाच वेग घेतला आहे. चालू हंगामात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने दिंडोरीतील बळीराजा चिंतेत पडला होता. दुबार पेरणीचे संकट घोंगावत असतानाच, काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आणि पहाटेपर्यंत पावसाने जोर धरला. या संततधार पावसामुळे कोरडी पडत चाललेली पिके टवटवीत झाली असून खरिपाच्या पिकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.
तालुक्यात पूर्वभागासह पश्चिम पट्ट्यातही पावसाचा जोर चांगला आहे. दिंडोरी तालुक्याचा पश्चिम पट्टा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या पावसामुळे भातखाचरांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, शेतक-यांनी भाताच्या आवण्यांच्या (लागवड) कामांना गती मिळणार आहे. तसेच मका, सोयाबीन आणि भुईमूग यांसारख्या खरीप पिकाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची शेतात लगबग पाहायला मिळत आहे.
मजुरांची टंचाई भासू नये म्हणून अनेक ठिकाणी सहकार्याने शेतीकामे उरकण्यावर भर दिला जात आहे. कालपासून सुरु झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील छोटे-मोठे नाले आणि ओढ प्रवाहित झाले आहेत. विहिरींच्या आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही यामुळे सुधारणा होण्यास मदत होणार आहे. अद्याप मोठ्या नद्यांना पूर आला नसला तरी, असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकंदरीत, या पावसाने दिंडोरी तालुक्यातील चिंतेचे डग दूर केले असून बळीराजाच्या चेहन्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




