मुंबई । प्रतिनिधी Mumbai
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले. त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही वाढ ७६ लाख मतांची असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे केला. निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करण्याची मागणी करून पटोले यांनी निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा आरोप केला.
हे देखील वाचा– Judgment of the Court : अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीची आश्चर्यकारक ठरले आहे. या निवडणुकीत महविकास आघाडीला ५० आमदारांचा आकडा सुद्धा गाठता आला नाही. काँग्रेसने या [पराभवाचे खापर मतदान यंत्रावर (ईव्हीएम) फोडले असून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.
हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा
या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी वाढीव मतदानाबाबत शंका उपस्थित केल्या. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यामुळे त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते. यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल करत पटोले यांनी वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी उपस्थित केलेल्या शंकांकडे लक्ष वेधले. या शंकांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, असे पटोले म्हणाले.
हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू
काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा