नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. शनिवारी सकाळी इस्त्रायलने अचानक इराणची राजधानी तेहरानसह ३० ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणमधील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. मात्र इस्त्रायलने अशाप्रकारे हल्ला केल्याने मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणाव वाढला आहे.
या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणवरील या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारावरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर होणार आहेत.
युध्दाचा भारतावर काय परिणाम होणार?
काही बाजार तज्ज्ञांचे लक्ष इराणच्या प्रतिक्रियेकडे आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांवर इराणची काय प्रतिक्रिया येते आणि तणाव किती काळ टिकतो, यावरच बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.
युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार रिस्क घेण्याचे टाळतात; त्यामुळे शेअर बाजारात घसरण दिसू शकते. ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढते; त्यांच्या किमती विक्रमी पातळीवर जाऊ शकतात. डॉलरची मागणी वाढल्यास रुपया घसरु शकतो, ज्याचा आयातीवर परिणाम होतो आणि आयात महाग होते.
कच्चा तेलाच्या किमती वाढू शकता
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत साधारणपणे ६७ डॉलर प्रति बॅरल एवढी आहे. यात आधीच २ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो.
चाबहार बंदर
इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे. या प्रकल्पात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. तणाव वाढल्यास लॉजिस्टिक्स आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो.
होर्मुज सामुद्रधुनी
जगातील सुमारे 20% तेल आणि भारतात येणाऱ्या तेलातील मोठा हिस्सा या अरुंद समुद्री मार्गाने येतो. हा मार्ग बंद झाला तर पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि तेलाचे दर झपाट्याने वाढू शकतात.





