नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी पार पडल्यानंतर CJP ने ‘स्कुल ठीक करो’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत सीजेपीची टीम विविध सरकारी शाळांत जाऊन तेथील शिक्षण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. अशातच राजस्थानची राजधानी जयपूरजवळील रामपुरा-कंवरपुरा परिसरातील एका सरकारी शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या CJP च्या टीमला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या Cockroach Janta Party (CJP) च्या विरोध करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात पथकातील सदस्यांवर हल्ला करण्यात आल्याचा आणि वाहनांवर दगडफेक करून त्यांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला आहे. या घटनेत CJPचे सहसंयोजक अशुतोष रांका यांच्यासह काही कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
CJPकडून सरकारी शाळांची पाहणी करण्यासाठी ‘School Thik Karo’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पक्षाने सांगितले आहे.
या मोहिमेअंतर्गत जयपूरमधील रामपुरा-कंवरपुरा गावातील सरकारी प्राथमिक शाळेत CJPचे पथक पाहणीसाठी पोहोचले. मात्र, टीम गावात पोहोचताच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांचा एक गट दाखल झाला. गावकऱ्यांनी सीजेपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना शाळेची पाहणी करण्यास मज्जाव केला. परिस्थिती चिघळल्यानंतर कार्यकर्त्यांना गावातून निघून जाण्यास सांगण्यात आले आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. सीजेपीचे कार्यकर्ते आशुतोष रांका यांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपावर कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही.
शाळेची अवस्था चर्चेत
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेच्या अवस्थेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. अहवालानुसार, ही शाळा पूर्वीच असुरक्षित घोषित करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित शाळेच्या इमारतीऐवजी गुरांच्या/म्हशींच्या गोठ्यासारख्या जागेत भरवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. CJPच्या ‘School Thik Karo’ मोहिमेत अशाच खराब अवस्थेतील सरकारी शाळांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
CJPचा भाजपवर गंभीर आरोप
घटनेनंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित लोक असल्याचा आरोप केला. CJPच्या म्हणण्यानुसार, पथक शाळेची पाहणी करून तेथील परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करत होते; मात्र त्यांना विरोध करून हिंसक वातावरण निर्माण करण्यात आले.
मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हल्ला केला, हा आरोप सध्या CJPकडून करण्यात आलेला आरोप आहे. त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांचा तपास आणि अधिकृत निवेदन महत्त्वाचे ठरणार आहे.
संपादकीय : २१ ऑगस्ट २०२६ – कर्तव्यकठोरता अन् विवेकाचा समतोल हवा
याआधीही शाळा पाहणीवरून वाद
CJPच्या शाळा पाहणी मोहिमेला राजस्थानात यापूर्वीच राजकीय वादाची किनार मिळाली होती. CJPने राज्यातील विविध जिल्ह्यांमधील खराब अवस्थेतील सरकारी शाळांची पाहणी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजस्थानच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळांच्या परिसरात परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये, तसेच शाळांमध्ये छायाचित्रण, व्हिडीओ शूटिंग, मुलाखती आणि लाइव्ह स्ट्रीमिंगवर निर्बंध घातले होते.
CJPने जयपूरसह अजमेर, जोधपूर, उदयपूर, धौलपूर, भरतपूर, कोटा, बारमेर आणि हनुमानगड या जिल्ह्यांतील शाळांच्या पाहणीसाठी विनंत्या आल्याचे यापूर्वी सांगितले होते.




