मुंबई | Mumbai
भारतीय संगीत क्षेत्रातील अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी (ता. १२ एप्रिल) रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आशाताईंचे निधन झाले. शनिवारी ११ एप्रिल रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रासह, राजकिय, सामाजिक क्रिडा क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, सध्या त्यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आशा भोसले यांनी 18 मार्चला इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट केली असून ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो जोडला आहे. इंटरनॅशनल गोरिल्लाज या बँडसोबतचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये मागील बाजूस भारतीय वस्ती, हत्ती आणि काही मोडकळीस आलेल्या वस्तू दिसत आहेत. या फोटोमध्ये आशा ताई हिरव्या रंगाच्या साडीत आहेत. या फोटोसहित त्यांनी एक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. यामध्ये त्यांनी संगिताप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी ‘The Shadowy Light’ या गाण्याबद्दल आपले भावनिक विचार व्यक्त केले होते.
त्यांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
आशा भोसलेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “‘The Shadowy Light’ या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत गहन अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन, अत्यंत पवित्र अशा गंगा नदीच्या प्रवासात सहभागी होत आणि माझ्या नजरेस पडणाऱ्या दृश्यांचे बारकाईने निरीक्षण करत असतानाच—मला जीवनाचा खरा अर्थ उमजला; मी कोण आहे आणि या पृथ्वीतलावर मला नक्की काय करायचे आहे, याची मला जाणीव झाली. ‘The Shadowy Light’ या गाण्यामध्ये, या खोलवर वाहणाऱ्या नदीला पार करणे हे माझ्या जीवनप्रवासाचेच प्रतीक आहे… माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रती माझी निष्ठा, माझी कर्तृत्वे आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी व एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्ये—या सर्वांचेच ते प्रतिनिधित्व करते.”
तसेच, “या जीवननदीला पार करून जाण्यासाठी मला मदत करणारा तो नावाडी म्हणजे माझे संगीत आहे. तोच माझा मार्गदर्शक आहे आणि जेव्हा मी नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा जीवनप्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला ‘मोक्ष’ (परम मुक्ती) प्राप्त होईल. ज्या अवस्थेत मी आपल्या सभोवताली सर्वत्र तरंगणाऱ्या हजारो नादांपैकीच एक आवाज बनून जाईन. जर तुम्ही त्या आवाजांपैकी काहींना एकत्र गुंफले, तर त्यातून एक अत्यंत सुंदर सुरावट निर्माण होते. म्हणूनच, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन; जो कालांतराने एका सुंदर गीतातील एक ‘सूर’ (संगीत-स्वर) बनेल—आणि ते गीत पुढील हजारो वर्षांपर्यंत, अनेक पिढ्यांकडून ऐकले जाईल. निसर्गाशी एकरूप होण्याची ही जी मुक्ती आहे, तीच नदीच्या दुसऱ्या तीरावर माझी प्रतीक्षा करत आहे.” — आशा भोसले”





