मुंबई | Mumbai
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीचे प्रकरण अजून शांत झालेले नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा कधी होणार, याची वाट पाहावी लागणार असल्याने परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात २ लाख २६ हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीचा पेपर घेण्यात येणार होता, मात्र त्या आधीच आता पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
ठाण्यातून काही जणांना ताब्यात घेतले, प्रश्नपत्रिकाही जप्त
काही टोळ्या पैसे घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचवत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून ज्या संशयितांकडे हा पेपर होता, त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्नपत्रिका जप्त केल्या. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शिक्षण विभागाला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्रातील पेपरफुटीचे ग्रहण काही केल्या संपताना दिसत नाहीये. परीक्षा होण्याच्या २४ तास आधीच पेपर बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. या परीक्षेचे पेपर पैसे देऊन वाटले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून पेपर वाटणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यांना हे पेपर कुठून मिळाले? सूत्राधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून सध्या पेपर वाटणाऱ्या संशयितांची चौकशी सुरू आहे. शिक्षण विभागाला या सगळ्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण विभागही आपली भूमिका थोड्याच वेळात जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Nashik Crime News: फुटबॉल बेटिंगवर स्ट्राइक; सायबर पेट्रोलिंगने उघड केलं दीड कोटीचं बेटिंग रॅकेट
आधीच या टीईटी (TET) परीक्षे संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे मोठी चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा आधीच वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी होती. अशातच आता थेट पेपर लीक झाल्याने शिक्षण विभागाने ही परीक्षा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून काही वेळातच या संदर्भातील अधिकृत ‘प्रेस नोट’ आणि सूचना जारी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत.

“कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणातच पार पडली पाहिजे, हा परीक्षा परिषदेचा ठाम आग्रह आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याने उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,” असे राज्य परीक्षा परिषदेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.




