अहिल्यानगर | Ahilyanagar
जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघातून भाजपने शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला.
अक्षय कर्डिले यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP Sharad Pawar) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि पालकमंत्री विखे-पाटील यांनी तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी प्राजक्त तनपुरे यांना आगामी काळात राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले असून, तनपुरे यांच्या जागी पक्षाने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे (Govindrao Mokate) यांना उमेदवारी दिली आहे.
हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून ‘या’ बड्या नेत्याची माघार; DCM सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?
मोकाटे यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोटनिवडणुकीसाठी (By Election) अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात याची कल्पना असल्याने शरद पवारांच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. यात तनपुरे यांनी अर्ज दाखल न केल्याने गोविंदराव मोकाटे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट सामना होणार आहे. येत्या २३ एप्रिलला राहुरीसाठी मतदान पार पडणार असून, ४ मे रोजी या पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.
हे देखील वाचा : Rahuri By Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी पाठवले दोन एबी फॉर्म; भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात अधिकृत उमेदवार कोण?
चव्हाण-विखे यांनी घेतली होती तनपुरेंची भेट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात आज (सोमवारी) सकाळी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
हे देखील वाचा : Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज; म्हणाल्या, “मला स्वप्नातही…”
शिंदे सेनेच्या नेत्याची बंडखोरी
महायुतीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे येथे भाजपने उमेदवार दिला आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी बंडखोरी करत पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.





