पुणे | Pune
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज (शनिवारी) पुण्यात (Pune) ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे काही वेळापूर्वी पुण्यात आगमन झाले. पुणे विमानतळावर (Pune Airport) दाखल होताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आदी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळावरून राहुल गांधी थेट हॉटेलकडे रवाना झाले असून, तिथून ते नियोजित कार्यक्रमस्थळाकडे जाणार आहेत.
‘छात्रों की गूंज’ अंतर्गत विद्यार्थिनींशी थेट संवाद
पुण्यातील आरटीओ (RTO) जवळील ‘एआयएसएसएमएस’ (AISSMS) शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसच्या देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा असलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त एकही राजकीय नेता उपस्थित राहणार नाही. सायंकाळी ६ वाजता राहुल गांधींचे भाषण सुरू होईल. त्यानंतर ते थेट विद्यार्थिनी आणि तरुणींच्या प्रश्नांना उत्तरे देतील. या संवादादरम्यान शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन…”; CM फडणवीसांचा गंभीर आरोप
४२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; कडक पोलीस बंदोबस्त
या कार्यक्रमासाठी सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी (Student) नोंदणी केली असल्याने प्रचंड गर्दीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पुणे पोलिसांकडून ५००० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वार, पार्किंग परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये विशेष पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.पुण्यातील तरुणाईशी आणि विद्यार्थिनींशी थेट संवाद साधताना राहुल गांधी कोणती भूमिका मांडतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एनएसयूआय आणि अभाविप आमनेसामने
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला काल (शुक्रवारी) रात्री पुण्यात भाजप प्रणित विद्यार्थी संघटना ‘अभाविप’ (ABVP) आणि काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ (NSUI) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा पलटवार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या राड्यावर राहुल गांधी आजच्या कार्यक्रमात काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे.




