नाशिक | Nashik
काही दिवसांपूर्वी मुंबईतील महापौर कार्यालय, शाळा तसेच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या धमकीमुळे सर्वत्र एकच खळबळ पसरली होती. या धमकीला महिना देखील उलटला नसताना आता ठाण्यासह राज्यातील ८ जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुळे एकच खळबळ उडाली असून न्यायालयांची तपासणी करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायाधीशांनी ईमेल पाहताच क्षणाचाही विलंब न करता सुरक्षा यंत्रणांना सूचना दिल्या आणि संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले.
खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना तातडीने बाहेर काढून संपूर्ण इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. पोलीस, बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS) आणि सायबर सेलने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कोर्ट इमारती रिकाम्या करून झाडाझडती सुरू आहे. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयाला असा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती असून सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अधिक तपास सुरू आहे. सायबर पोलिसांकडूनही (Police) ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी ई-मेल द्वारे आज देण्यात आली. त्यानुसार, 27 नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री 9.11 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. सन 1984 मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये केला आहे. आपण दिलजीत दोसांझ याचा साथीदार असल्याचा उल्लेख करत, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली आहे. “मराठी बांधवांनो, आपल्या मुलांना वाचवा, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवले जातील.”, अशा आशयाचा मजकूर मेलमध्ये आहे.
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; थेट दिले महत्वाचे आदेश
नाशिक न्यायालयाला मिळाला धमकीचा ई-मेल
जिल्हा न्यायालय उडवण्याचा ई मेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून सोमवारी (दि.२) सखोल तपासाणी केली. त्यात बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकाने नविन न्यायालयीन इमारतीची तपासणी केली. मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्हा न्यायालयांना सोमवारी ईमेलवर धमकी आल्या. खबरदारी म्हणून स्थानिक पोलिसांनी तातडीने न्यायालयीन इमारतींची तपासणी केली. त्यानुसार, दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत बीडीडीएस आणि श्वान पथकांनी न्यायालयांची तपासणी केली. तसेच वाहनतळाचीही पाहणी केली. सर्व सुरक्षीत असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयीन नियमीत सुरु झाले. याआधीही धमकीचे ईमेल अज्ञातांनी पाठवून यंत्रणेस वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
सांगलीतही न्यायालयाची सुरक्षा वाढवली
सांगली जिल्हा सत्र न्यायालयातही बॉम्ब ठेवला असल्याचा मेल प्राप्त झाला असून बॉम्बने न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या तपासणीसाठी आणि सुरक्षितेसाठी सांगली जिल्हा पोलीस दल बॉम्बशोधक आणि एक श्वान पथकासह न्यायालयाच्या इमारतीत दाखल झाले. सर्वांनाच न्यायालयातून तातडीने बाहेर घेण्यात आले. साधारणता दीड वाजता मेल आला असून तीन वाजून 11 मिनिटांनी न्यायालयाची इमारत उडवून देऊ असा उल्लेख मेलमध्ये आहे.
सोलापूर न्यायालय उडवून देण्याची धमकी
सांगली, सातारा न्यायालयानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला असून न्यायालय बॉम्बने उडवून द्यायचा उल्लेख त्यात आहे. कोर्टाला ई-मेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यानंतर, संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम पोलिसांनी केले.
हिंगोलीतही बॉम्बेच्या ई-मेलमुळे खळबळ
हिंगोली शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे, ही धमकी न्यायालयाच्या पोर्टलवरील मेल आयडीवर देण्यात आली असून सकाळी 11 वाजता हा मेल न्यायालयाकडे प्राप्त झाला आहे. या धमकीमुळे हिंगोली शहरांमध्ये खळबळ उडाली असून बॉम्बशोधक पथकाच्या वतीने संपूर्ण न्यायालयाची तपासणी करण्यात आली असून श्वान पथक हिंगोली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी न्यायालयात दाखल झाले आहेत.
बीडमध्येही खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल
बीड जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली असून जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत. बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आल्याची प्राथमिक माहिती आहे.
सायबरकडून तपास सुरू
दरम्यान, सायबर पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे, यामध्ये काय तथ्य आहे तेदेखील तपासले जात असून आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर न्यायालयाचे काम पूर्ववत सुरू व्हावे. सर्वांनी शांतता राखावी आणि न्यायालयाच्या परिसरात थांबू नये असे देखील आवाहन बीड पोलिसांकडून पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.




