रायगड | Raigad
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज (९ मार्च) रोजी २० वा वर्धापनदिन छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी साजरा झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सहकुटुंब रायगडावर दाखल होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज ठाकरेंपासून करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरेंनी आज वर्धापन दिन असून, १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्या मेळाव्यात सर्व बोलले, असे त्यांनी म्हटले.
यावेळी ते म्हणाले, “आज पक्षाचा वर्धापनदिन असून, १९ तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळेस बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलले. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष सदस्य नोंदणी करण्याचे ठरवले होते. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त पक्ष सदस्य नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना माझे आवाहन आहे की, अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. नुसते सदस्य नाही तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचं आहे. त्यामुळे ज्या वर्दळीच्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल लागली पाहिजेत”, असे राज ठाकरेंनी म्हटले.
हे देखील वाचा : Raj Thackeray : मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “जात धर्म…”
पुढे ते म्हणाले की,आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर (Raigad) पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात आपण केली आहे.महाराजांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जा. येत्या १९ तारखेला म्हणजे गुढीपाडव्याला माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे (Maharashtra) हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी गुलाल उधळत शिवतीर्थावर यावे, असे म्हणत राज ठाकरेंनी पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या उपक्रमाला सुरुवात झाल्याचे सांगितले.
दरम्यान, राज ठाकरेंनी आज राजकीय (Political) विषयावर बोलणे टाळल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे १९ मार्चला म्हणजे गुढी पाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी राज ठाकरे कोणावर निशाणा साधतात? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.




