मुंबई | Mumbai
दहा राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) सात जागांचा समावेश होता. आज (दि.०५) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) अर्ज भरण्याची मुदत होती. ही मुदत दुपारी तीन वाजेनंतर संपली असून, राज्यातील सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, औपचारिक घोषणा १६ मार्चला होईल.
हे देखील वाचा : Rajya Sabha Election : शिंदे सेनेचा राज्यसभेचा उमेदवार ठरला; इंग्रजीत PHD, पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारेंना संधी
राज्यातील राज्यसभेच्या सात जागांपैकी महायुतीच्या (Mahayuti) वाट्याला सहा जागा आल्या होत्या. यात भाजपला चार तर शिंदेसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. तर महाविकास आघाडीला एका जागा मिळाली होती. यानंतर भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि शिंदे सेनेकडून प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाली. तसेच महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला.
हे देखील वाचा : अखेर ठरलं! नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; राज्यसभेसाठी अमित शाहांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
दरम्यान, त्यानंतर आज (गुरुवारी) विधानभवनात (Vidhanbhavan) भाजपच्या उमेदवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि पार्थ पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ हजेरीत अर्ज भरला. तसेच शिंदे सेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत भरला. तर शरद पवारांचा उमेदवारी अर्ज खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यासह मविआ नेत्यांच्या हजेरीत दाखल केला.




