मुंबई | Mumbai
शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची भाजपवर नाराजी कमी होण्याचे काही नाव घेत नाही. सत्तार यांनी भाजपविरोधात उघड-उघड नाराजी बोलून दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मुंबई बोलावून घेतले. एकनाथ शिंदे आणि संभाजीनगर येथील खासदार, आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचा धर्म पाळण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांसह अन्य खासदार आणि आमदारांना दिल्या. सत्तार यांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने महायुतीत लहान भावाला किंमत नाही का, असा सवाल केला आहे.
महायुतीत सुरु असलेली अंतर्गत धुसफूस आणि जागावाटप-खातेवाटपाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, माजी आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीमधील ‘मोठा भाऊ आणि लहान भाऊ’ या वादावर आपली तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. “संख्याबळानुसार निश्चितच आम्ही महायुतीत लहान भाऊ आहोत, यात दुमत नाही. पण लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्त्वाचा असतो, जितका मोठा भाऊ असतो,” अशा शब्दांत मिटकरींनी आपली खंत बोलून दाखवली आहे.
भाऊ मोठा की लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता महत्त्वाची
अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना मिटकरी म्हणाले की, सत्तार हे राज्याचे माजी मंत्री असूनही केवळ पुत्रप्रेमापोटी अशी विधाने करत आहेत, जी महायुती धर्माला अजिबात पटणारी नाहीत. भाऊ मोठा की लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता महत्त्वाची असते. तसेच, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असून, तेव्हा आम्ही महायुतीत बरोबरीचे भाऊ ठरतो की मोठे भाऊ, हे वेळच सिद्ध करेल, असेही त्यांनी म्हटले.
महायुतीत आम्हाला मिळणारी ही वागणूक अत्यंत वेदनादायी
“अजितदादा महायुतीत आले तेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. सध्या सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, मात्र अर्थखात्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावर पूर्ण अधिकार असतानाही हे खाते अजूनही भारतीय जनता पक्षाकडेच ठेवण्यात आले आहे. महायुतीत आम्हाला मिळणारी ही वागणूक अत्यंत वेदनादायी आहे,” असल्याची खदखद मिटकरी यांनी व्यक्त केली.




