Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरामदास कदमांच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार; 'थोरली बेगम' म्हणत उडवली खिल्ली, म्हणाले...

रामदास कदमांच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार; ‘थोरली बेगम’ म्हणत उडवली खिल्ली, म्हणाले…

जालना | Jalna
बीड जिल्ह्यातील नगद नारायणगडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. या नाराजीचे कारणेही त्यांनी भरसभेत सांगितले. आपल्या नावावर 500 कोटी रुपये कोणी घेतले असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर शिंदे सेनेचे शिलेदार जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले. रामदास कदम यांनी तर त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. रामदास कदमांचे हे आव्हान जरांगे पाटलांनी स्वीकारले आहे. ते बुधवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे सेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले होते. यामध्ये रामदास कदम आघाडीवर होते. रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांची औकात काढत पुन्हा एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये, असा सज्जड दम भरला होता. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांना उल्लेख ‘थोरली बेगम’ असा केला. मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले. मात्र, तुम्ही चिडताय, बावचळून गेला आहात. तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का, याबाबत हा किंवा नाही म्हणा. भाजप तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवताय , या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे, थोरल्या बेगमला हे कळालं पाहिजे. थोरली बेगम बोलली ना काल, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांची खिल्ली उडवली.

- Advertisement -

मला उद्ध्वस्त करणं सोपं नाही
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, माझं काही वाकडं करू शकत नाहीत, मला उद्ध्वस्त करणं सोपं नाही. एवढे आम्ही लेचेपेचे नाहीत, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला. औकात काय आहे काय नाही हे उद्या सांगतो. आम्ही औकात कोणाची वाढवली सांगतो. मी एवढंच विचारतोय पाचशे कोटी रूपये मला दिले की नाही ते सांगा. हो म्हणा किंवा नाही म्हणा. औकात काय असते ते दिसणार आहे, असे जरांगे म्हणाले.

तू उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, सगळ्यांना फसवतोस; रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर घणाघात

कदम एवढं बेचैन झाल्यासारखं बोलतील असे वाटले नव्हते. मला काही वाटत नाही, त्यांच्या आरडण्या ओरडण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. एकनाथ शिंदे म्हणाले तेव्हाच रामदास कदम बोलले. बाप दाखवा नाहीतर श्राध्द घाला म्हणतायत म्हणजे मला दिले नाहीत. उद्या मराठे विचारतील कोण लाचार, मग लाव चौकशी. प्रमाणपत्र रद्द करुन तुम्ही नरडे दाबायला लागलात का?. मी भीत नाही चौकशीला आणि यापूर्वीच चौकश्या लावल्यात, खोट्या केसेस आणि आमच्यावर बोलायला लावणं, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

तुम्ही उगाच चिडचिड करु नका
रामदास कदम म्हणतात माझ्या संपत्तीची चौकशी करा. त्यांनी पक्षासाठी खूप काही केले आहे, खस्ता खाल्ल्या आहेत, हे मी ऐकून आहे. तुम्ही उगाच चिडचिड करु नका. थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला. पण तुम्ही चिडचिड करण्यापेक्षा मी काय बोललो हे समजून घ्या. मी साधा प्रश्न विचारला आहे की, मला श्रीकांत शिंदे यांच्याकरवी 500 कोटी रुपये दिले का, फक्त त्याचं उत्तर द्या. मी वाट बघतोय शिंदे साहेब काय बोलतात. थोड्या दिवसांत कळेलच की आपण बोलण्याआधी विचार करायला हवा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

भाजपचे खूप मोठे नेते याबाबत बोलत आहेत, यामध्ये काही महिला आहेत
भाजपचे खूप मोठे नेते याबाबत बोलत आहेत. यामध्ये काही महिला आहेत, त्या खूप शुद्ध हिंदी बोलतात, बाकीचे महाराष्ट्रातील असावेत. मला काय माहिती हे मोठे लोक आपल्याला ओळखतात. ते इतकी शुद्ध भयानक मराठी बोलतात की, ते सगळा मराठी शब्दकोश व्याकरणासहित हाताळू शकतात. इतके ते शुद्ध बोलतात. आम्ही एकनाथ शिंदे यांना जाब का विचारु नये. आम्ही तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, तुम्हाला डोक्यावर घेतले होते. मग तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं का देऊ नयेत. एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकरवी मला 500 कोटी रुपये दिले का, हे सांगावे. का त्यांनी भाजपकडून पैसे घेतले आणि आम्हाला दिले नाहीत, हे स्पष्ट करावे, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

ताज्या बातम्या