जालना | Jalna
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील राजकीय घडामोडींवर खळबळजनक दावे केले आहे. नवनाथ बन यांच्या व्हायरल क्लिपवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी, “हे कोणतंही AI नाही, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील एक मोठा गेम प्लॅन आहे,” असा थेट दावा केला आहे.
ऑडिओ क्लीपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणी बडा नेता असला पाहिजे. याचा शोध शिंदे साहेब, फडणवीस साहेब (Devendra Fadnavis) यांनी घ्यावा. या प्रकरणात शिंदे साहेबांसाठी (Eknath Shinde) जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजायला आम्ही तयार आहोत. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही मदत करायला तयार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
राजकीय करिअर उद्ध्वस्थ करण्याचा डाव होता का?
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “ही क्लिप AI द्वारे तयार करण्यात आलेली नाही. शिंदे साहेबांवर हा वैयक्तिक घाव घातला गेला असून त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा डाव होता का? याचा विचार केला पाहिजे. मला काल मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून हा सगळा प्रकार घडवून आणला गेला आहे. फडणवीस साहेब जर याच्या मुळाशी गेले, तर त्यांच्याही विरोधात हा एक मोठा गेम होता हे त्यांच्या लक्षात येईल.”
यांच्या पाठीशी दिल्लीतून हात असला पाहिजे
फडणवीस साहेब खोलात गेले तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेम होता हे लक्षात येईल. क्लिपमध्ये बोलणारे लोक कोणाचे, ही कोणाची यंत्रणा आहे. यांच्या पाठीवर कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही बैठक आहे त्यामधून दिसून येते की, ते प्लॅनिंग करतात, नरेटिव्ह सेट करतात. यांच्या पाठीशी दिल्लीतून हात असला पाहिजे. भाजपपेक्षा मोठी संस्था यांच्या पाठिशी असावी. माझ्याविरोधात बोलणारे सगळ्यांना नोटा दिल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
राहुल गांधींची अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष सुटका, सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा
मराठीमध्ये AI मध्ये करण्याइतके ते एवढे सक्षम नाही, मी गप्प बसणार नाही
या सगळ्याचा खोलात जाऊन शोध घेतला नाही तर या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता, असा संदेश जाईल. माझ्याकडे कोणतंही यंत्र नाही, मी एआय व्हिडीओ कसा तयार करणार, तुम्ही कशालाही AI म्हणणार का? या सगळ्यात भाजपचे लोक होते. मात्र, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती की नव्हती, हाच प्रश्न आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठीमध्ये AI मध्ये करण्याइतके ते एवढे सक्षम नाही. आम्ही पण शोधात आहोत. मी गप्प बसणार नाही मी शोध घेणार. आता मी यांच्या मागे लागणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
सत्तेच्या बाहेर जाऊन जेलमध्ये जाण्याची भीती असल्याने त्यांना आता सहनच करावे लागेल
“सध्या आतली खदखद खूप डेंजर आहे. आम्हाला दोन्ही गटातील माहिती मिळत असते. सत्ताधारी असो वा विरोधक, सगळेच लोक येत्या काळात उठाव करणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करताना कोणत्याही दबाव आणणाऱ्या यंत्रणांचा वापर न करता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.” सत्तेच्या बाहेर जाऊन जेलमध्ये जाण्याची भीती असल्याने त्यांना आता सहनच करावे लागेल. ते काहीही बोलले तरी मी आता शांत बसणार नाही, मी या लोकांच्या मागे लागणार आहे, असा इशारा संजय शिरसाट यांना दिला.
रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, रामदास भाई बोलले त्याला प्रखर भूमिका म्हणत नाहीत. हे लोक जे षडयंत्र रचत होते, ते आम्ही बाहेर काढले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांचे आभार मानले पाहिजेत.




